Home क्राईम सौम्य कलमाखाली गुन्हा नोंदवणार्‍या अधिकार्‍याला निलंबित करणार ! मुख्यमंत्री प्रमोद सावंत,...

सौम्य कलमाखाली गुन्हा नोंदवणार्‍या अधिकार्‍याला निलंबित करणार ! मुख्यमंत्री प्रमोद सावंत, हणजूण येथे पर्यटक कुटुंबावर प्राणघातक आक्रमण केल्याचे प्रकरण.

155

सिंधुदुर्ग :१४ मार्च (वार्ता.) – हणजूण येथे पर्यटनासाठी आलेल्या देहली येथील पर्यटक कुटुंबावर तलवार आणि चाकू यांच्या साहाय्याने आक्रमण करण्यात आले. या जीवघेण्या आक्रमणाचा गुन्हा कलम ३०७ अंतर्गत (हत्येचा प्रयत्न) नोंद करण्याऐवजी तो कलम ३२४ अंतर्गत (तीक्ष्ण हत्याराने दुखापत करणे) म्हणजे सौम्य कलमाखाली नोंद करण्यात आला. जीवघेण्या आक्रमणाची नोंद योग्य प्रकारे न घेतलेल्या पोलीस अधिकार्‍याला सेवेतून निलंबित करून या घटनेचे सखोल अन्वेषण केले जाणार आहे. १३ मार्च या दिवशी सायंकाळपर्यंत संबंधित अधिकारी सेवेतून निलंबित होणार आहे, अशी माहिती गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पोलीस, पर्यटन आणि कामगार खाते यांच्या संयुक्त बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार ही घटना घडल्यानंतर संबंधित पोलीस अधिकार्‍याचे अन्यत्र स्थानांतर करण्यात आले आहे. पर्यटक जतीन शर्मा आणि त्यांचे कुटुंबीय हणजूण येथे पर्यटनासाठी आले होते. या वेळी शर्मा कुटुंबियांनी ते वास्तव्यास असलेल्या हॉटेलचा कर्मचारी रायस्टन डायस याच्या अनियंत्रित वागण्याविषयी हॉटेल व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती आणि या तक्रारीनंतर रायस्टन डायस याला सेवेतून काढण्यात आले होते. याचा वचपा काढण्यासाठी रायस्टन डायस याने त्याच्या साथीदारासह हॉटेलमध्ये जतीन शर्मा यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले.पर्यटक जतीन शर्मा यांनी १२ मार्च या दिवशी त्यांच्या ‘इन्स्टाग्राम’च्या अधिकृत हँडलवरून या घटनेविषयी दोन चलचित्रे प्रसारित करून पोलिसांनी या प्रकरणी गुंडांच्या विरोधात सौम्य स्वरूपाचा गुन्हा नोंदवल्याचा आरोप केला. सामाजिक माध्यमातून प्रकार उघडकीस आल्यावर पोलीस खात्याने संबंधित पोलीस उपनिरीक्षकाच्या विरोधात खात्यांतर्गत कारवाईला प्रारंभ केला होता. पोलिसांनी या प्रकरणी १२ मार्च या दिवशी ३ संशयितांना, तर १३ मार्च या दिवशी एका संशयिताला कह्यात घेतले. या प्रकरणी अजूनही अटक होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री गोवा राज्य

घटनेविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांनी कायदा हातात न घेता याविषयी पोलिसांना माहिती देऊन कायद्याचे पालन करावे.’’ पर्यटन खात्याकडे नोंदणी केलेल्या हॉटेलांची संख्या ५ पटींनी वाढली* !‘पर्यटन खात्याने राज्यात हॉटेल नोंदणी मोहीम आरंभली आहे. या अंतर्गत पर्यटन खात्याकडे नोंदणी केलेल्या हॉटेलांची संख्या १ सहस्र २०० वरून ६ सहस्र झाली आहे. हॉटेलमालकांनी कर्मचार्‍यांची नेमणूक करतांना त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पडताळावी, तसेच परराज्यातील कर्मचार्‍यांची नेमणूक करतांना पोलीस पडताळणीही करावी. हॉटेलमालकांनी रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपक बंद करून ध्वनीप्रदूषण नियमांचे काटेकारपणे पालन करावे. ध्वनीप्रदूषणामुळे दहावी इयत्तेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी’, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.