संपादकिय: सावंतवाडी शहरातील भटवाडी येथील रहिवासी आणि सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी काल एक व्हिडिओ मुलाखत देऊन त्या मुलाखतीमध्ये एका पत्रकाराचा अति घाणेरड्या भाषेत नाव न घेता उल्लेख केलेला आहे. जर सुनील पेडणेकर यांच्या म्हणण्यानुसार खरंच एखादा पत्रकार असं चुकीचं काम करून सावंतवाडीत वावरत असेल तर ते लोकसभेच्या चौथ्या स्तंभाला लाजिरवाणं आणि घातक आहे. परंतु सुनील पेडणेकर यांनी बोललेले शब्द जर चुकीचे असतील आणि कुणाच्या वैयक्तिक वादातून असतील तर त्यांच्यावर लोकसभेच्या चौथ्या स्तंभाचा अपमान केल्याबाबत योग्य तो गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. त्यामुळे सुनील पेडणेकर यांनी त्या पत्रकाराचे नाव घोषित करावे आणि त्या पत्रकाराच्या काय चुका आहेत? या रितसर पत्रकार परिषदेत मांडाव्यात. जेणेकरून असा कोणी पत्रकार खरंच समाजाला घातक असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी सरकारकडे मागणी करता येईल.
पत्रकार म्हणजे कोणी सामान्य माणूस नाही. एक पत्रकार आपल्यापर्यंत सामाजिक घडामोडी पोचवत असतो. अनेक बाबतीत, अनेक विषयांवर, अनेक प्रकरणांवर लक्ष टाकत असतो व त्याचा अभ्यास करून चांगले मुद्दे, वाईट मुद्दे समाजासमोर आणत असतो. असा पत्रकार चुकीचा असेल तर त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच जर अशा एखाद्या पत्रकारावर चूक नसताना किंवा कोणतेही कारण नसताना एखाद्या व्यक्ती चुकीचं बोलत असेल तर त्या व्यक्तीवर ही योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सावंतवाडी तालुक्यातील पत्रकारांनी विचार करणं गरजेचे आहे की, सुनील पेडणेकर सारखे व्यक्ती सावंतवाडी तालुक्यातील एका पत्रकाराबाबत काहीतरी बोलतात आणि त्याची कोणत्याही प्रकारे योग्य ती चौकशी न करता किंवा त्या पत्रकाराचे नाव न देता ती बातमी सावंतवाडीतील पत्रकार प्रसारित करतात. हे ही खूप चुकीचे आहे. त्यामुळे अशा पत्रकारांवर सुद्धा योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. समाज घडवण्यात, देश घडवण्यासाठी, देशाच्या प्रगतीत पत्रकारांची योग्य ती भूमिका आहे. तसेच पत्रकारांचा मोठा वाटा आहे. पण आज काही किरकोळ पत्रकारांकाडून तसं न होताना दिसत आहे. पत्रकारांचे आपापसात झालेले वाद, जाहिरातींसाठी आणि व्यवसायासाठी चालू असलेल्या स्पर्धा, पत्रकारांच्या वेगवेगळ्या संघटना, आपल्या संघटनांना पुढे नेण्यासाठी आणि आपले वर्चस्व टिकवण्यासाठी पत्रकारांच्या स्पर्धा आणि त्याहून लाजस्पद म्हणजे किरकोळ पैशासाठी आणि एकवेळ हॉटेलमध्ये मिळणाऱ्या जेवणासाठी नेत्यांच्या दारात जाऊन त्यांना जशा पाहिजेत तशा बातम्या बनवून समाजाची दिशाभूल करण्यासाठी सध्या काही पत्रकार पुढे येत आहेत आणि हे समाजासाठी, देशासाठी हानिकारक आहे. त्यामुळे पत्रकारितेशी एकनिष्ठ असणाऱ्या आणि योग्य पद्धतीने पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांनी याकडे जातीनिशा लक्ष देणे ही सध्या काळाची गरज आहे. कारण यामुळे लोकसभेचा चौथा स्तंभ आणि पत्रकारिता बदनाम होत आहे. हे नाकारता येणार नाही. त्यामुळे पत्रकारांच्या विरोधातच काही पत्रकार जे काही चुकीची कारवाई करत आहेत किंवा कोणत्याही प्रकारे योग्य ती माहिती न घेता पत्रकारिता करत आहेत, तसेच एखाद्या व्यक्तीने दिलेली मुलाखत विचार न करता प्रसारित करत आहेत अशा पत्रकारांवर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे.
पैसा हा जगण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पण त्यासाठी चुकीची पत्रकारिता करून समाजाची दिशाभूल करण्यासारखं काम जर काही पत्रकार करत असतील तर त्याना वेळीच योग्य ती जागा दाखवणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी ज्या पत्रकाराबाबत बोललेलं आहे, त्या पत्रकाराची खरंच चूक असेल तर तो पत्रकार समाजासाठी हानिकारक आहे. त्यामुळे त्या पत्रकाराला माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी समाजासमोर आणणं गरजेचं आहे. अन्यथा सुनील पेडणेकर यांनी पत्रकार समाजाची लेखी माफी मागणं गरजेचं आहे. तसेच विचार न करता ज्या पत्रकारांनी ही मुलाखत प्रसारित केली आहे, त्यां पत्रकरांनी सुद्धा सुनील पेडणेकर यांनी त्या पत्रकाराचे नाव सांगितले नाही. तसेच त्या पत्रकाराचे गुन्हे सिद्ध केले नाही, तर चुकीची बातमी प्रसारित करून एखाद्या लोकसभेच्या चौथ्या स्तंभात काम करणाऱ्या पत्रकाराची बदनामी केल्याबाबत माफी मागणं गरजेचे आहे. यासाठी काही पत्रकरांनी पुढे येणे गरजेचे आहे. असं मला तरी वाटतं. अन्यथा योग्य वेळी योग्य काम करण्यासाठी आम्ही सक्षम आहोतच.