सिंधुदुर्ग: स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सेवेत संधी मिळू शकते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तयार करण्याचे आपले स्वप्न आहे. स्पर्धा परीक्षा कठीण असल्या तरी त्यात यश मिळवणे अशक्य नाही, ही गोष्ट प्रत्येकाने आपल्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी ची तयारी आतापासूनच करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी लागणारीसर्वतोपरी मदत करण्यास आपण तयार असल्याची ग्वाही तिमिरातून तेजाकडे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुंबई सीमा शुल्क विभागाचे अनुवादक सत्यवान रेडकर यांनी दिली.
केंद्रीय नवोदय विद्यालय सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या तिमिरातून तेजाकडे उपक्रमातील 288 व्या निशुल्क व्याख्यानात रेडकर बोलत होते. यावेळी प्राचार्य-एम.के.जगदीश, उपप्राचार्य-ए.जी.कांबळे, जे.बी.पाटील, एस.पी. हिरेमठ, एस.के. यादव, ए.एस.वाने, ओम प्रकाश, झीनत आतार, गावडे, पत्रकार दीपक जाधव आदी उपस्थित होते.
रेडकर म्हणाले, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आपल्याला त्या परीक्षांबाबत माहिती असणे आवश्यक आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यापासून ते पदवीधारक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देऊ शकतात. या परीक्षा सामोरे जाण्यासाठी रोजच्या अभ्यासासोबतच आपले सामान्य ज्ञान वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासही करणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे वरिष्ठ अधिकारी हे बहुतांश जिल्हा बाहेरील असतात. कोकणात आणि विशेषता सिंधुदुर्ग बुद्धिमान मुलांची फौज असताना देखील ते सरकारी अधिकारी बनत नाहीत हे दुर्दैवी आहे. सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गाव बनविणे यासाठीच तिमिरातून तेजाकडे ही संस्था काम करते. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी निशुल्क मार्गदर्शन आम्ही करतो. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि भविष्यात सरकारी उच्च अधिकारी बनावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
व्याख्यानानंतर भक्ती धनवडे, अनुजा देसाई, निर्झरा जाधव, हेरंब धोंगडे, मयूर देसाई, राहुल तेली, मुनिंद्र कदम, रूपाली साटम व श्रेया वर्दम या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.