Home स्टोरी सिंधुदुर्ग ‘अधिकाऱ्यांचा जिल्हा’ म्हणून नावारूपास येईल तो सुवर्णदिन. – प्रा. रूपेश पाटील

सिंधुदुर्ग ‘अधिकाऱ्यांचा जिल्हा’ म्हणून नावारूपास येईल तो सुवर्णदिन. – प्रा. रूपेश पाटील

72

सातार्डा येथे ‘चला घडवूया करिअर!’ विषयावर व्याख्यान संपन्न . 

 

सावंतवाडी: तब्बल तेरा वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शालांत आणि इतर शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल आहे. मात्र असे असले तरी एमपीएससी व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये तसेच बँकिंग व इतर स्पर्धात्मक परीक्षेत आपली मुलं अपेक्षित यश अद्याप मिळवू शकले नाहीत. ही गोष्ट मनाला खंत देणारी आहे. मात्र आता विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता येऊन पालकही सजग झाले आहेत. म्हणून आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून नावावर उपास येईन आणि तो दिवस सुवर्ण दिन म्हणून आपणास पहावयास मिळेल, अशी अपेक्षा प्रेरणादायी व्याख्याते व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील यांनी सातार्डा येथे आयोजित व्याख्यानादरम्यान व्यक्त केली.

 

सातार्डे मध्यवर्ती संघ, मुंबई संचलित महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूल सातार्डा येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व प्रेरणादायी वक्ते प्रा. रुपेश पाटील यांचे ‘चला घडवूया करिअर.!’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर सातार्डे मध्यवर्ती संघ मुंबई संस्थेचे अध्यक्ष अनिल तळवणेकर, कार्यवाह राजाराम आरोंदेकर, माजी संस्था अध्यक्ष महेंद्र मांजरेकर, खजिनदार प्रदीप कवठणकर तसेच शालेय समितीचे अध्यक्ष नारायण (श्याम) हळदणकर, उपाध्यक्ष पंकज मेस्त्री, सदस्य अजित कवठणकर, दीपक नाईक, अमोल सातार्डेकर, शुभम पिळणकर, सौ. शर्मिला मांजरेकर, सल्लागार ज्ञानेश्वर मांजरेकर तसेच मुख्याध्यापक प्रशांत सावंत आदी उपस्थित होते.

 

दरम्यान आपल्या ओघवत्या शैलीत प्राध्यापक रुपेश पाटील यांनी व्याख्यान सादर केले. ते पुढे म्हणाले आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैसर्गिक बौद्धिक क्षमता आहे. येथील विद्यार्थी सातत्याने शालेय पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. मात्र एमपीएससी व यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपले विद्यार्थी मार्गदर्शनाअभावी कमी पडत आहेत. ही बाब चिंताजनक असून विद्यार्थ्यांनी आता जागरूक असायला हवे. केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध नोकऱ्यांमध्ये लागू असलेल्या स्पर्धा परीक्षांच्या कास धरून आपला जिल्हा अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून नावारूपास आला पाहिजे, अशी अपेक्षाही प्रा. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक सुभाष नाईक यांनी केले तर आभार प्रदर्शन शालेय समितीचे अध्यक्ष श्याम हळदणकर यांनी केले.

 

या मार्गदर्शनपर व्याख्यानाचा लाभ सातार्डा पंचक्रोशीतील सातार्डा, कवठणी, किनळे, सातोसे या गावांतील विद्यार्थ्यांनी व पालकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे संयोजन सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी केले.