Home क्राईम सावंतवाडी येथील गुटखा गोडाऊनवर अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची धाड.

सावंतवाडी येथील गुटखा गोडाऊनवर अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची धाड.

256

सुमारे १ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त गोडाऊन सील…! दोघे ताब्यात, ४ दिवसांची पोलीस कोठडी.

सावंतवाडी: न्यू खासकीलवाडा येथील नवसरणी रोडवर असलेल्या गोडाऊनवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकत अवैध गुटख्यासह सुमारे एक कोटी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी गजानन उर्फ गौरव चंद्रशेखर नाईक ( २९, रा. न्यू खासकीलवाडा, सावंतवाडी ) याच्यासह टेम्पो चालक सुंदर लक्ष्मण कुबल ( ४३, रा. चराठे, ता. सावंतवाडी ) यांना ताब्यात घेतले. तर अवैध गुटखा वाहतूकीसाठी वापरण्यात आलेली बोलेरो पिकअप देखील पोलीसांनी जप्त केली. संबंधित गोडाऊनला देखील सील करण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा संशयतांना येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर गोडाऊन मालक चंद्रशेखर पांडुरंग नाईक फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई सिंधुदुर्ग जिल्हा अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंके यांच्यासह पथकाने केली. याबाबतचा तपास सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले व उपनिरीक्षक प्रमोद पाटील करीत आहेत.

सिंधुदुर्ग अन्नसुरक्षा प्रशासन विभागाला मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे अन्नसुरक्षा अधिकारी किशोर साळुंके हे त्यांचे सहकारी सहायक आयुक्त (अन्न), सिंधुदुर्ग मो. शं. केंबळकर, अन्न सुरक्षा अधिकारी, गुप्तवार्ता व दक्षता, मुख्यालय, मुंबई निलेश विशे, सहायक आयुक्त (अन्न), ठाणे अरविंद खडके, अन्न सुरक्षा अधिकारी, ठाणे राहुल ताकाटे, अन्न सुरक्षा अधिकारी, सातारा इम्रान हवालदार, अन्न सुरक्षा अधिकारी, कोल्हापुर महेश मासाळ, अन्न सुरक्षा अधिकारी, कोल्हापुर मंगेश लवटे तसेच पंच साक्षिदार भरत पांडुरंग धवन राहणार साळुंके नगर, दिग्विजय नामदेव धवन, कळंबा ता. करवीर, जि. कोल्हापुर हे बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास सावंतवाडी न्यू खासकीलवाडा येथील संबंधित गोडाऊन समोरील रस्त्यावर पोहचले असता तेथे त्यांना सफेद रंगाची महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप ( एम एच o७ – एजे २४३६ ही गाडी पेटी कडीबंद उभी असल्याची आढळुन आली. सदर गाडीचा चालक सुंदर कुबल याला ओळख सांगून वाहनाचा मागील दरवाजा उघडून पाहीला असता वाहनात प्रतिबंधित अन्न पदार्थाचा मोठा साठा हा विक्री व वाहतुकीस्तव साठवलेला आढळून आला. यात विमल तसेच व्ही -१ व दुबई गुटखाच्या गोण्या आढळून आल्या.

तपासणीवेळी सदर प्रतिबंधित अन्न पदार्थ हे कोणाकडुन आणले त्याबाबतीतले चलान वैगरे बाबत माहीती विचारली असता सुंदर कुबल याने सदर साठा हा चंद्रशेखर पांडुरंग नाईक, राहणार सावंतवाडी, यांचे मालकीचा असल्याचे सांगितले.

त्यानंतर तपासणीवेळी वाहनाजवळ असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील गोडावुन प्लॉट क्रमांक ई २८७, न्यू खासकीलवाडा, नवसरणी रोड, सावंतवाडी हे श्री चंद्रशेखर नाईक यांचे असल्याचे व आपण त्यांचेसाठी प्रतिबंधित अन्न पदार्थाची विक्रीवाहतुक करीत असल्याचे वाहन चालक कुबल याने सांगितले. त्यानंतर गाडीतील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्यानंतर वाहनाजवळ असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील गोडावुन प्लॉट क्रमांक ई २८७, न्यु खासकीलवाडा, नवसरणी रोड, सावंतवाडी येथे अधिकारी गेले असता इमारतीच्या तळमजल्यांवर असलेले गोडावुनचे शटर उघडे असलेले आढळले. सदर गोडावुन मध्ये गजानन उर्फ गौरव चंद्रशेखर नाईक हा आढळून आला. त्याने गोडावुनचे मालक आपले वडील चंद्रशेखर पांडुरंग नाईक हे असल्याचे व त्यांचे वतीने प्रतिबंधित अन्न पदार्थाचा व्यवसाय सांभाळत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या समक्ष गोडाऊन मधील प्रतिबंधित सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या कारवाईत गजानन उर्फ गौरव नाईक याच्यासह टेम्पो चालक सुंदर कुबल या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर अवैध गुटखा बाळगणे व विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता दोघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर यातील मुख्य सूत्रधार गोडाऊन मालक चंद्रशेखर नाईक हा फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.