Home स्टोरी सावंतवाडी तालुक्यातील चौकूळ केगदवाडी येथील पाण्याच्या तळीचे काम अपूर्ण….

सावंतवाडी तालुक्यातील चौकूळ केगदवाडी येथील पाण्याच्या तळीचे काम अपूर्ण….

90

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावातील केगजवाडी येथे प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना २०१८-१९ अंतर्गत चौकुळ केगदवाडी तळी नूतनीकरण करणे हे काम ११ मार्च २०२० रोजी सुरु करण्यात आलं. या कामासाठी निविदा रक्कम रुपये १०,२९,२९८ रुपये मंजूर झाली आहे. हे काम पूर्ण करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत होती. अशी माहिती मिळते. परंतु कामाची मुदत संपून दोन वर्ष पूर्ण होऊन ही हे काम आज पर्यंत अपूर्ण आहे. हे काम अजून पर्यंत अपूर्ण का आहे? किंवा ह्या कामाला एवढा उशीर का झाला?

कामाचा तपशील

याबाबत संबधित ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता कोणत्याही प्रकारे योग्य ती उत्तरे मिळत नाहीत. या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव अशी ही खूप जुनी तळी आहे. चौकूळ केगदवाडी येथील ही जुनी पाण्याची तळी एकेकाळी त्या वाडिवरील एकमेव अशा पिण्याच्या पाण्याची तळी होती. तसेच याच ठिकाणी जुन्या पद्धतीने कपडे धुण्यासाठी तयार केलेली विशेष जागा होती. पण कालांतराने तळीच्या विकासाच्या नावाखाली तळीची दुरावस्थाच झाली आहे. हे नाकारता येणार नाही.

पाण्याच्या तळीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था

सर्वात महत्त्वाचं म्हणजे वीस वर्षांपूर्वी ह्या तळीकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था खूपच चांगली होती. पण सध्या चांगल्या पद्धतीने तळीचा विकास होतोय असं सांगितलं जातं पण त्या तळी कडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था खूपच वाईट आहे.

पाण्याच्या तळीकडे जाणारा रस्ता

मग यावरून असे प्रश्न उपस्थित होतात की, जे काही पूर्वी होतं ते चांगलं होतं का? आता जे चालू आहे ते खरंच चांगलं आहे काय? नेमका तळीचा विकास होतोय काय? की फक्त आणि फक्त फंड वापरून एखाद्या ठेकेदाराचं पोट भरण्यासाठी हे फंड काढून अशा प्रकारची कामं केली जातात? असे प्रश्न उपस्थित होण्यामागचे कारण म्हणजे सध्या चौकूळ केगदवाडी येथील त्या पाण्याच्या तळीची असलेली दुरावस्था हे आहे.

वीस वर्षांपूर्वी याच केगदवाडीवर खूप लोकसंख्या होती. येथील जास्तच जास्त व्यक्ती सैन्यामध्ये काम करून सेवा निवृत्त झालेले होते. त्यामुळे ते वास्तव्यास केगदवाडी येथे होते. आज कालांतराने काही जुने व्यक्ती जिवीत राहिले नाहित. ते काळाच्या पडद्याआड गेले. पुढील पिढी कामाधंद्यासाठी मुबंई – पुणे सारख्या शहरात स्थायिक झाले. कारण या गावाकडे फारसे रोजगार उपलब्ध नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे या गावातील जमीन खडकाळ असल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शेती वगैरे करण्यात योग्य नाही. तसेच थोडीफार चांगली जमीन आहे पण हवामानानुसार त्या ठिकाणी सर्व प्रकारचे विशेषता उत्पन्न देणारी कोणतीही शेती होत नाही. किरकोळ नाचणे,भात आणि भाजीपाला अशा प्रकारची शेती होते. पण या शेतीवर सध्या परिस्थितीत उदरनिर्वाह करता येणं शक्य नाही. त्यामुळे साहजिकच लोकांना व्यवसाय धंद्यासाठी बाहेरगावी जावं लागलं आणि त्यामुळे या वाडीवर सध्या लोकसंख्या खूपच कमी आहे. यात महत्त्वाचं म्हणजे सध्या वाडीवर असलेल्या व्यक्तींमध्ये जास्तच जास्त व्यक्ती हे माजी सैनिक आहेत. आपल्या भारत देशाची सेवा करून पुढील आयुष्य निवांत जगण्यासाठी हे व्यक्ती आपल्या गावात या वाडीवर राहत आहेत. आणि अशा व्यक्तींना जपताना पाण्यासारख्या मूलभूत सुविधांची जर कमतरता तर हे लाजस्पद आहे. यासाठी सरकारने या गावातील पाण्यासारख्या महत्वपूर्ण समस्येकडे लक्ष देणं महत्वाचे आहे.