Home स्टोरी सावंतवाडी जिमखाना जाधववाडी येथील मागासवर्गीय रहिवाशांवर अन्याय

सावंतवाडी जिमखाना जाधववाडी येथील मागासवर्गीय रहिवाशांवर अन्याय

151

सावंतवाडी प्रतिनिधी: जिमखाना जाधववाडी येथील मागासवर्गीय रहिवाशांवर अन्याय करून पूर्वांपार वहिवाटीचा रस्ता कुंपण घालून बंद केला. जिमखाना जाधववाडी येथील शंभर वर्षापेक्षा जास्त पूर्वांपार वहिवाटीचा रस्ता सत्यवान शेडगे या व्यक्तीने येथील रहिवाशांना दमदाटी करून वाटेवर तारेच कुंपण घालून रस्ता बंद केला. त्या जमिनीचा मालक सुनील नारायण जाधव हा मागासवर्गीय व्यक्ती असून त्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. काही वर्षा पुर्वी त्याची पत्नी मृत्यू पावली. त्याला दोन लहान मुलं आहेत. सदर व्यक्तीच्या अशिक्षित पणाचा गैर फायदा घेऊन, तसेच ज्यांनी त्याच्या बिकट परिस्थितीमध्ये त्याच्या मुलांना लहानाचे मोठे केले, शिक्षण दिले, घर बांधून दिले, अशा तेथील रहिवाशांमधील एकाही व्यक्तीला विश्वासात न घेता परस्पर व्यवहार करून तोंडी आश्वासन देऊन तुला घर बांधून देतो व दोन्ही मुलांच्या नावावर बँकेत पैसे ठेवतो. असे तोंडी खोटे आश्वासन देऊन दारू पाजवून प्रसंगी थोडे थोडे पैसे देऊन स्वतःच्या पत्नीच्या नावावर सदर व्यक्तीची दोन गुंठे जमीन पत्नीच्या नावावर चढवून घेतली.

जमिनीच्या व्यवहारात सुनील जाधव यांची फसवणूक करून त्याचाही पलीकडे जाण्याचा रस्ता बंद केला. तसेच इतर मागासवर्गीय वस्तीतील लोकांचा हि त्यांच्या घरापर्यंत जाण्याचा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणी आजारी पडल्यास सदर पेशंटला हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत वाहन पोहोचू शकत नाही. कारण येण्या-जाण्याचा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे. तसेच तेथील काही लोकांना रमाई घरकुल योजना मंजूर झाल्याने घर बांधणीकरिता त्याठिकाणी मालवाहतूक करणे सुद्धा कठीण झालेले आहे. अशी खंत तेथील रहिवाशांनी व्यक्त केली. तेथील मागासवर्गीय रहिवाशांवर अन्याय झालेला असून या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी सदर रहिवाशांनी आज बुधवार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी तहसीलदार कार्यालयात जाऊन तहसीलदार अरुण उंडे यांना निवेदन सादर केले आहे. तहसीलदार अरुण उंडे यांनी आपण या सर्व विषयाची सविस्तर माहिती घेऊन पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याशी बोलणं करून सदर व्यक्तीला योग्य समज दिली जाईल, असे आश्वासन उपस्थित रहिवाशांना दिले. तसेच पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचीही रहिवाशांनी भेट घेतली असता सदर विषयातील योग्य मार्ग काढला जाईल, असे आश्वासन दिले. दोन्हीकडे निवेदने सादर करून निवेदनाच्या माध्यमातून कारवाई करण्यासाठी चार दिवसाची मुदत दिलेली आहे. बंद केलेला रस्ता मोकळा करून न दिल्यास सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर १० एप्रिल २०२३ पासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा जिमखाना जाधववाडी येथील रहिवाशांकडून देण्यात आलेला आहे.