Home Uncategorized सावंतवाडीतील राजवाड्यात “प्रतापगडाचा रणसंग्राम” विषयावर व्याख्यान संपन्न..

सावंतवाडीतील राजवाड्यात “प्रतापगडाचा रणसंग्राम” विषयावर व्याख्यान संपन्न..

83

शिवरायांचा प्रताप गडावरील पराक्रम म्हणजे इतिहासातील सर्वोत्तम लढाई! – शिवचरित्रकार शिवरत्न शेटे

सावंतवाडी: अत्यंत क्रूरकर्मा, महाबलाढ्य, प्रचंड कपटी व मुत्सद्दी असलेल्या अफजलखानाचा प्रतापगडावर शिवरायांनी कोथळा काढून मिळविलेला विजय हा इतिहासातील शिवरायांची पराक्रमाची यशोगाथा लिहिणारा व मराठ्यांच्या खऱ्या अर्थाने पराक्रमाची साक्ष देणारी घटना असून यानंतर जगभरात शिवरायांची कीर्ती पसरली, असे वक्तव्य सुप्रसिद्ध शिवचरित्रकार शिवरत्न शेटे यांनी येथे व्यक्त केले.

राजवाडा (सावंतवाडी)

सावंतवाडी येथील राजवाड्यात रविवारी ‘प्रतापगडाचा रणसंग्राम’ या विषयावर शिवचरित्रकार शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान संपन्न झाले. सिंधुमित्र सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडीद्वारा शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या व्याख्यानाचे सहावे पुष्प इतिहासतज्ज्ञ शिवरत्न शेटे यांनी गुंफले. यावेळी श्रीमंतराजे खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज लखम सावंत-भोसले, बीकेसीचे शिल्पकार अच्युत सावंत भोसले, डॉ.प्रवीण ठाकरे, डॉ.उदय नाईक, ॲड. शामराव सावंत, इतिहासतज्ज्ञ डॉ.जी ए बुवा, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक वाय.पी.नाईक, डॉ.विशाल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.’प्रतापगडाचा रणसंग्राम’ या विषयावर पुष्प गुंफतांना इतिहासकार शिवरत्न शेटे म्हणाले, छत्रपती शिवरायांचे अतुलनीय शौर्य, विलक्षण बुद्धीचातुर्य, अत्यंत नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि गनिमी कावा या साऱ्यांची जगाला प्रचिती देणारे युद्ध म्हणजे प्रतापगडाचा रणसंग्राम होय. अफाट फौजेनिशी आलेल्या अफजलखानाला मराठ्यांच्या अतुलनीय शौर्याने प्रतापगडावरच संपविले. यामागे छत्रपती शिवरायांची अलौकिक बौद्धिक क्षमता तर होतीच शिवाय त्यांच्याजवळ असलेले त्यांचे विशेष वकील पंतोजी गोपीनाथ बोकील यांची प्रसंगावधान कूटनीती आणि गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची मुत्सद्येगिरी देखील महत्वपूर्ण व निर्णायक ठरली. दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी दुपारी १.३० वाजता छत्रपती शिवराय व अफजल खान यांची झालेली भेट आणि त्यानंतर अफजलखानाने गमावलेला प्राण ही घटना म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना होती. मराठ्यांना त्यांच्या पराक्रमाची जाणीव या घटनेमुळे तर झालीच, परंतु छत्रपती शिवरायांच्या शौर्याची गाथा अफगाणिस्तान, तुर्कस्तान, सौदी अरेबिया, इंग्लंड अशा अनेक देशांपर्यंत पोहोचली. म्हणूनच प्रतापगडाचा रणसंग्राम केवळ अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणे एवढीच मर्यादित ही घटना नाही, तर जगातील सर्वोत्तम युद्धांपैकी एक आहे, असे इतिहासकार सेतू माधव पगडी लिहितात, असेही भाष्य शिवरत्न शेटे यांनी केले.आपल्या व्याख्यानातून शिवरत्न शेटे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या अंगी असलेल्या मातृत्व, दातृत्व, नेतृत्व, धैर्य व प्रसंगावधान अशा गुणांचा परिचय करून दिला. महाराजांच्या अंगी असलेल्या मानसशास्त्रीय कौशल्यांचा परिचय सुद्धा आपल्या व्याख्यानातून श्री. शेटे यांनी करून दिला.

इतिहासाचे विकृतीकरण थांबवा – शिवरत्न शेटे

आपल्याला अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी होते, असे सांगण्यात येते. मात्र हे अत्यंत चुकीचे असून शिवरायांचा आरमार प्रमुख दौलत खान होता. महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना त्यांची सुटका करण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत करणारा मदारी मेहतर, शिवरायांचे वकील काझी हैदर व शिवरायांचे चित्र रेखाटणारा थोर चित्रकार मीर मोहम्मद हे सर्वच मुस्लिम समाजाचे होते. मात्र स्वराज्यासाठी ते छत्रपती शिवरायांबरोबर ‘मराठे मावळे’ म्हणून लढले. म्हणून आपण छत्रपती शिवरायांची सर्वधर्म समभाव वृत्ती व छत्रपती शिवरायांचा दूरदृष्टीकोन समजून घेतला पाहिजे आणि इतिहासाचे विकृतीकरण थांबवले पाहिजे, असे आवाहन आपल्या व्याख्यानातून शिवरत्न शेटे यांनी केले.निष्ठेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे शिवरायांचे मावळे छत्रपती शिवरायांनी आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात जीवाला जीव देणारे सवंगडी, मित्र व मावळे तयार केले. म्हणूनच ‘स्वराज्य’ उभे राहू शकले. स्वतः च्या मुलाचे लग्न बाजूला करून कोंढाणा घेण्यासाठी जीवाचे बलिदान देणारे तानाजी मालुसरे, सिद्धी जोहरशी प्राणपणाने लढणारे शिवा काशीद, फक्त ३०० मावळ्यांना घेऊन घोडखिंड लढणारे बाजीप्रभू देशपांडे, तसेच महाराजांसाठी स्वतःचे प्राण सदैव वेचण्यासाठी तयार असलेले जिवाजी महाले, हिरोजी इंदुलकर, येसाजी कंक, कोंडाजी फर्जंद असे कितीतरी निष्ठावान मावळे महाराजांनी तयार केले म्हणूनच छत्रपती शिवराय हे केवळ पन्नास वर्षाच्या आयुष्यात शेकडो गड किल्ले जिंकून स्वराज्य उभे करू शकले. मात्र अलीकडे स्वार्थासाठी निष्ठा विसरून गेलेले राज्यकर्ते निर्माण झाले आणि म्हणूनच स्वराज्याचे सुराज्य होऊ शकले नाही, अशीही खंत शेटे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राहुल गव्हाणकर यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका सीमा पंडित, आभार अँड्र्यू फर्नांडिस यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिंधुमित्र सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.