Home स्पोर्ट सायली सनये हिला राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक ! 

सायली सनये हिला राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक ! 

59

मसूरे प्रतिनिधी: ॲमेच्युअर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने जळगाव येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग आणि बेंच प्रेस व डेडलिस्ट स्पर्धेत ठाण्याच्या सायली समीर सनये हिने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक प्राप्त केले. सदर स्पर्धेचे यजमानपद यंदा जळगाव जिल्ह्याला मिळाल्याने भुसावळच्या ‘अग्रसेन भवन’ येथे ही स्पर्धा २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान पार पडली होती. त्यातील ५७ किलो मास्टर्स गटात सायली हिने नेत्रदीपक कामगिरी करताना पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक संपादन केले. तत्पूर्वी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या ठाणे व मुंबई उपनगर जिल्हास्तरीय स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळवून तिने सुवर्णपदक मिळवले होते. त्यामुळे सलग तीन स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करून सुवर्ण पदकांची हॅटट्रिक केली आहे. सायली सनये हि ठाण्यातील लुईसवाडी येथे राहत असून, ती महावितरणच्या डोंबिवली येथील विभागीय कार्यालयात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे. तिच्या या यशाने महावितरणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . सायली ही देवगड तालुक्यातील तांबळडेग गावच्या सुहास सनये यांची सून असून पत्रकार पांडुरंग भाबल यांची ज्येष्ठ कन्या आहे.