मसुरे प्रतिनिधी: सायकल प्रवास आरोग्यासाठी नेहमीच चांगला. हा संदेश शाळेतील विद्यार्थ्यांना, तरुणांना देत मसुरे नं. १ शाळेचे पदवीधर शिक्षक विनोद सखाराम सातार्डेकर यांनी वराडकरवाडी वायरी भूतनाथ ते मसुरे नं. १ शाळा हा सुमारे २५ किलोमीटर प्रवास सायकलने करत आगळावेगळा संदेश दिला आहे. विनोद सातार्डेकर हे आपल्या मसुरे येथील प्रशालेतील विद्यार्थ्यांना वेळोवेळी सायकल चालवण्याचे फायदे विशद करत असतात. तसेच शालेय विद्यार्थ्यांना ते योगा, नाट्य, कला, क्रीडा, काव्य, विविध वाद्य वादन आदी प्रकारचे मोफत शिक्षण देत असतात. विनोद सातार्डेकर हे नावाजलेले कीर्तनकार असून आपल्या कीर्तनाच्या कलेतून ते समाजपयोगी सेवा आणि समाजाला संदेश नेहमी देत असतात. सातार्डेकर हे उत्कृष्ट नाट्य कलाकार तसेच उत्कृष्ट निवेदक,पखवाज वादक म्हणून सुद्धा मालवण तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहेत.

सध्याच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या काळात सायकल चालवण्याचा व्यायाम शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही आरोग्यदायी आहे. योग आणि व्यायामाप्रमाणे सायकल चालवल्यानं हृदय आणि फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहते. सकाळी सायकल चालवल्यामुळे दिवसभर ऊर्जा मिळते आणि रात्री झोपही चांगली येते असे शिक्षक विनोद सातार्डेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. या उपक्रमाला मुख्याध्यापिका शर्वरी सावंत, गुरुनाथ ताम्हणकर, गोपाळ गावडे रामेश्वरी मगर, उमेश खराबी, हेमलता दुखंडे, केंद्रप्रमुख नारायण देशमुख, स्थानिक शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सन्मेश मसुरेकर, उपाध्यक्ष शितल मसुरकर, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर आदीनी शुभेच्छा दिल्या.