सिंधुदुर्ग: मराठी भाषा विषय सीबीएसई, आयसीएसई आणि इतर मंडळांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सक्तीचा करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.या शासन निर्णयावर काही प्रश्न उपस्थित करण्यात आले, त्यावर शालेय शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. CBSE, ICSE शाळांसाठी मराठी विषय सक्तीचाच असून मूल्यांकन पद्धत फक्त एका बॅचपुरती असेल असं शिक्षण विभागानं सांगितलं आहे. राज्य शासनाने पुढील तीन वर्षासाठी इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मराठी विषयांचे मूल्यांकन श्रेणी स्वरुपात होणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आता मराठी विषयाचे स्थान फक्त अ-ब-क-ड पुरते म्हणजे ‘श्रेणी’पुरतीच राहिल्याची टीका केली जात आहे. त्यानंतर राज्य शासनाच्या वतीनं हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. १ जून २०२० च्या शासन निर्णयानुसार सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे.
हे धोरण पुढील वर्गांना पुढील प्रमाणे लागू करण्यात येते. इयत्ता पहिली ते पाचवी: पहिली- २०२०-२०२१, दुसरी- २०२१-२०२२, तिसरी- २०२२-२०२३ चौथी -२०२३-२०२४ पाचवी – २०२४-२०२५
इयत्ता सहावी ते दहावी: सहावी- २०२०-२०२१, सातवी- २०२१-२०२२, आठवी- २०२२-२०२३, नववी- २०२३-२०२४ दहावी २०२४-२०२५