Home स्टोरी सत्यजीत चव्हाण, संदीप परब यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान..!

सत्यजीत चव्हाण, संदीप परब यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान..!

32
पुरस्कार स्विकारतांना सत्यजित चव्हाण

मसूरे प्रतिनिधी:  समाजाच्या आजूबाजूला अनेक बऱ्या वाईट घटना घडत असतात. पण संख्येचा विचार करता वाईट घटनांची जंत्री अधिक आहे. चांगल्या घटनांमधून उत्तम समाज घडेल. मात्र, वाईट प्रवृत्तींमधून तो मोठ्या प्रमाणावर बिघडत आहे. म्हणूनच राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि पर्यावरण या भवतालाशी समाज बांधील राहण्याची आज खूप मोठी गरज आहे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि जनता दल, मुंबईचे अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी कट्टा येथे केले. कट्टा येथे बॅरिस्टर नाथ पै सेवांगण आणि परिवर्तन संस्था, मुंबई यांच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक साथी लक्ष्मण जाधव सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात पर्यावरण चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते सत्यजीत चव्हाण आणि निराधारांसाठी काम करणारे संदीप परब यांना विशेष पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

समाजासाठी आपण सर्व बांधील आहोत, हे आता आपण सर्वजण विसरलो आहोत. परिणामी त्याचा फायदा वाईट प्रवृत्ती घेत आहेत. राजकारणाशी तर फटकून वागत असल्याचे दूरगामी परिणाम आता दिसून येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला तर नाथ पै, मधू दंडवते अशा दिग्गज नेत्यांची आणि त्यांच्या विचारांची मोठी परंपरा आहे. याच विचारांना पुढे घेऊन जाण्याची आज मोठी गरज आहे आणि यासाठी आपण सतत लोकांमध्ये राहून त्यांच्या सुखदुःखात सामील व्हायला हवे असे विचार नारकर यांनी मांडले.

प्रतिकूल वातावरण असताना सुद्धा सत्यजीत चव्हाण यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, नाणार आणि बारसू रिफायनरीला जोरदार विरोध केला आणि कोकण उद्ध्वस्त करणाऱ्या या विनाशकारी प्रकल्पांना रोखण्याचे काम केले. मात्र हे करत असताना त्यांना आणि त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांना खूप हाल सहन करावे लागले आणि अजूनही ते संपलेले नाहीत. पण, असीम जिद्दीच्या जोरावर कोकणच्या शाश्वत विकासासाठी त्यांची जोरदार धडपड सुरू आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करताना त्यांना सन्मानचिन्ह, रोख १० हजार आणि मानपत्र देण्यात आले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना चव्हाण यांनी लढाई अजून संपलेली नसल्याचे स्पष्ट केले. पालघर ते सिंधुदुर्ग अशा सागरी आणि डोंगरी भागातील कोकणी जनतेने एकत्र येऊन विनाशकारी प्रकल्प रोखायला हवेत आणि तसे केले नाही तर ही देवभूमी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. याचवेळी आपण आपल्या भागातील नैसर्गिक संसाधनाचा वापर करत विकासाचे मार्ग शोधून काढायला हवेत. विरोध करताना आपल्या निसर्गपुरक विकासाचा सुद्धा विचार करायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

संदीप परब यांनी जीवन आनंद संस्थेच्या माध्यमातून पणदूर येथे संविता आश्रमाची स्थापना करत ‘नाही रे’ वर्गातील लोकांना आधार दिला. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३, तर मुंबईत ४ आणि गोव्यात २ आश्रम त्यांनी सुरू केले आहेत. या आश्रमांमुळे ५१० निराधारांना आधार मिळून आज ते सर्वजण सुखरूप आपल्या घरी परतले आहेत. तर सध्या ३००हून अधिक जणांची या आश्रमांमध्ये सेवा केली जात आहे. अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या निराधार मुले तसेच आधार नसलेल्या वृध्दांना संदीप यांनी आपलेसे केले. यात २ वर्षांच्या मुलीपासून ते ९० वर्षांच्या आजोबांचा समावेश आहे.

माझी ही जनतेची सेवा आता एकट्याची राहिलेली नाही. ज्यांचे कोणी नाही, अशा लोकांना आधार देण्यासाठी माझ्या सोबत काहीच लोक झटत आहेत. मात्र निराधार लोकांची मोठी संख्या पाहता समाजाच्या मोठ्या वर्गाने आता सोबत करण्याची गरज आहे. रस्त्यावर पडलेल्या तसेच घरात एकाकी भयाण जीवन जगणाऱ्या वृध्दांना सोबत करण्यासाठी संविता आश्रमाला आर्थिक मदतीची मोठी गरज आहे, असे आवाहन संदीप परब यांनी केले.

नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर यांनी सामाजिक दायित्वाची नाळ लोकांनी तोडता कामा नये, असे सांगत चंगळवादापासून स्वतःला रोखण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमात सी ए परीक्षा उतीर्ण झालेल्या गौतम दीपक भोगटे व शितल उदय वायंगणकर यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. जगदीश नलावडे यांच्या पुढाकाराने १९ वर्षे परिवर्तन संस्थेच्या वतीने हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नम्रता जाधव व किशोर शिरोडकर यांनी केले. सूत्रसंचलन वैष्णवी लाड यानी केले. या कार्यक्रमास विकास म्हाडगुत, जगदिश नलावडे, सिंधु नलावडे, बापू तळावडेकर, शरद मोरजकर, प्रियांका भोगटे, वीणा म्हाडगुत,मंगल परुळेकर, पत्रकार संजय परब, लक्ष्मीकांत खोबरेकर, संजय आचरेकर, रुचिरा चिंदरकर, काळसेकर सर, बाळकृष्ण गोंधळी,संध्या म्हाडगुत, सोनाली कोळंबकर,राजीव म्हाडगुत, सत्यजित चव्हाण, व संदीप परब यांचे सहकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सेवांगणचे विश्वस्त दीपक भोगटे यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.