राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे गदारोळ सुरु आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधिमंडळाला चोरमंडळ म्हटलं असल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. संजय राऊताच्या विधानावर सत्ताधारी आक्रमक झाले असून हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. दरम्यान भरत गोगावले यांनी संजय राऊतांवर टीका करताना ‘भाडखाऊ’ शब्द वापरल्याने एकच गदारोळ सुरु झाला. यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांनी हा शब्द मागे घेण्याची मागणी केली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गदारोळात सभागृह अनेक वेळा तहकूब करण्यात आलं.विधिमंडळमध्ये बनावट शिवसेना आहे. हे बनावट चोरांचं मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. कारण अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने , बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. ती पदे आम्ही अशी ओवाळून टाकतो. पदं गेली तर परत येतील, पण आम्हाला आमचा पक्ष महत्त्वाचा आहे,” असं संजय राऊत यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं.चोरांना पकडण्यासाठी कायदे करणारं हे मंडळ आहे. पण त्याला चोरमंडळ म्हटलं जात आहे. या माध्यमातून संपूर्ण देशभरात महाराष्ट्राचा अपमान केला जात असून हा महाराष्ट्रद्रोह आहे. यांना कोणी परवानगी दिली आहे. महाराष्ट्राबद्दल तुमच्या मनात हीच भावना असेल तर तशी भूमिका स्पष्ट करा. या सदनात कोणी दाऊद आहे का? येथील सदस्यांना तुम्ही चोर म्हणत आहात . त्यामुळे कारवाई झाली पाहिजे. आम्हाला बोटचेपी भूमिका अपेक्षित नाही. असं सभागृहात आशिष शेलार यांनी सांगितलं.