निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यरोपांचे सत्र सुरु आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आलं आहे? हे सगळ्यांना माहित आहे. आम्ही शुद्धीत आहोत. या लोकांची भांग उतरली की हे सरकार जाईल. या राज्याची जनता किती शुद्धीत आहे? ते कसब्याच्या निकालाने स्पष्ट झालं आहे. त्यामुळे भांग पिऊन जे सत्तेवर बसले आहेत त्यांना समजेल की महाराष्ट्र आणि राज्याची जनता काय आहे? त्यांची भांग कसब्यात उतरली आहे. महाराष्ट्रातली जनता भांग पिऊन काहीही करत नाही. कारण भांग पिऊन जनता निर्णय घेत असती तर कसब्यात जो निकाल लागला तो लागला नसता. आम्ही कुठली नशा करत असू तर भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्याची असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. आमच्या मित्रांना भांग पाजली होती मग ते काहीतरी बडबडत राहिले होते. असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी हे उत्तर दिलं आहे.या देशात जे चूक आहे ती चूक दाखवणाऱ्याला देशद्रोही ठरवलं जातं. त्याच्या विरोधात तपास यंत्रणा लावली जाते. नऊ विरोधी नेत्यांनी सरकारला पत्र लिहिलं त्यानंतर लालूप्रसाद यादव यांच्या घरी सीबीआयचे लोक गेले. मनिष सिसोदियांना अटक केली गेली. अशा गोष्टी घडतील. मात्र आम्ही झुकणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.