Home राजकारण षडयंत्र रचणारे संधीसाधू आणि पाठीत खंजीर खुपसणारे हा वारसा पुढे नेऊ शकत...

षडयंत्र रचणारे संधीसाधू आणि पाठीत खंजीर खुपसणारे हा वारसा पुढे नेऊ शकत नाहीत! कपिल सिब्बल

72

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अयोध्या दौऱ्यावर शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि राज्यसभा खासदार व ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सडकून टीका केली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी रामलल्ला यांच्या दर्शनासाठी जायचं असेल तर भक्त म्हणून जा, राजकीय पर्यटक म्हणून नाही असं सुनावलं. दुसरीकडे कपिल सिब्बल यांनी प्रभू रामांनी सत्याचा मार्ग निवडत त्याग केल्याची आठवण करत शिंदे-फडणवीसांना संधीसाधू आणि गद्दार म्हटलं.

काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी?

जे रामलल्ला यांच्या दर्शनासाठी अयोध्येला जात आहेत त्यांनी भक्त म्हणून दर्शन घ्यावं, राजकीय पर्यटक म्हणून जाऊ नये. या पवित्र ठिकाणाचा राजकारणासाठी वापर होताना पाहून वाईट वाटलं. असं असलं तरी ते केवळ ‘गद्दार’ आहेत, दुसरं काहीही नाही.



काय म्हणाले कपिल सिब्बल?

एकनाथ शिंदे हे अयोध्येत आहेत. प्रभू राम यांनी प्रामाणिकपणे सत्याचा मार्ग अवलंबला आणि त्याग केला. बाळासाहेब ठाकरे यांनी हे गुण आत्मसात केले. षडयंत्र रचणारे संधीसाधू आणि पाठीत खंजीर खुपसणारे हा वारसा पुढे नेऊ शकत नाही.” कपिल सिब्बल यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारं हे ट्वीट प्रियंका चतुर्वेदींनीही रिट्वीट केलं आहे.



दरम्यान एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अयोध्या दौऱ्याची माहिती देताना म्हटलं, जय श्रीरामच्या जयघोषात अयोध्या नगरीत माझे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातील सर्व सहकारी मंत्री आणि आमदार यांच्यासह प्रभू श्रीरामाचे जन्मस्थळ असलेल्या रामलल्लाच्या मंदिरात महाआरती केली.



अयोध्येतील हनुमान गढी येथे जाऊन भगवान मारुतीरायाचे भक्तिभावाने दर्शन घेतले. त्यानंतर जैन मंदिरात जाऊन भगवान महावीरांचे दर्शन घेऊन इतर महंतांची भेट घेतली. यावेळी शिवसेना भाजप युतीचे सर्व मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते, असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.