मसुरे प्रतिनिधी: भांडुप पश्चिम येथील पराग विद्यालयाच्या मैदानात आयोजित शूटिंगबॉल स्पर्धेत जयंत घोरपडे संघ (टेंभुर्णी ) सोलापूर संघाने एमबीपीटी मुंबई संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले.माजी आमदार श्याम सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबई शूटिंग बॉल असोसिएशनच्या मान्यतेने शुटिंग बाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई शूटिंग बाॅल असो.चे अध्यक्ष व माजी आमदार श्याम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नामवंत १८ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत जयंत घोरपडे संघ टेंभुर्णी सोलापूर, या संघाने एम बी पी टी मुंबईचा २१-७ असा एकतर्फी विजय प्राप्त केला. टेंभुर्णी सोलापूर संघाला 7 हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तर एम बी पी टी मुंबई संघाला 5 हजार रुपये आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. आरमार विक्रांत हा संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. तर शासकीय दूध डेअरी पुणे हा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. या दोन्ही संघांना प्रत्येकी ३ हजार रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली.या स्पर्धेत एम .बी .पी .टी .या संघाचा भूषण मेस्त्री उत्कृष्ट खेळाडू ठरला तर सामनावीर म्हणून टेंभूर्णी संघांचा नाना चौगुले याची निवड झाली. या दोन्ही खेळाडूंना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेचे उद्घाटन डॉ.राजेश भाटिया व डॉ.वसंत दराडे यांनी केले.मुंबई शुटिंग बाॅल संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.पारितोषिक वितरण समारंभाला माजी आमदार श्याम सावंत, माजी आमदार अशोक पाटील ,पराग विद्यालयाचे संस्थापक संचालक बाळकृष्ण बने शेठ, मुंबई शूटिंग बाॅल संघटनेचे सेक्रेटरी दीपक सावंत ,खजिनदार प्रफुल्ल वाईरकर, स्पर्धा नियंत्रक मुंबईचे माजी कर्णधार रत्नदीप रावराणे, सहसचिव मिलिंद बिर्जे, पांडूरंग सुतार, चंद्रकांत नगरे, सुनील गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.