भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे असल्याची अनेक वर्षांची धारणा आहे. मात्र आसाम राज्याने केलेल्या एका दाव्यामुळे आता जोरदार वाद सुरु झाला आहे. सहावं ज्योजिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी केला आहे. तशी जाहीरात आसामच्या पर्यटन विभागाने काढली आहे. या जाहीरातीवर आता महाराष्ट्र राज्यातून जोरदार टीका होत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनी या जाहीरातीवरुन शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.आसाम राज्यावर आपल्या मुख्यंमत्र्यांचे फार प्रेम आहे. कामाख्या देवी आणि इतर काही प्रकरणे मध्यंतरी झाली. त्यामुळे आसामच्या कृतीवर आमचे मुख्यमंत्री आता काय बोलतात? हे पाहावे लागेल. हा पोरकटपणा चालला आहे. गुजरात आमच्या उद्योगांवर आक्रमण करत आहेच. आता आसामचे मुख्यमंत्री आमच्या देवधर्मावर आक्रमण करु लागले आहेत. अशा शब्दात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.मंदिरावरुन चाललेलं राजकारण गलिच्छ….राज्यातून उद्योग गेले, आता मंदिरे देखील नेणार का? प्रत्येक राज्यातल्या मंदिराचा आम्ही आदर करतो. पण भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातच आहे. आसाममध्ये ज्योतिर्लिंगाचाही आम्ही आदर करतो. पण मंदिरांवरुन राज्या राज्यांमध्ये वाद निर्माण करणं, हे गलिच्छ राजकारण आहे. प्रत्येक राज्यातल्या मंदिराबाबत आम्हाला आदर आहे. पण सहावं ज्योतिर्लिंग हे भीमाशंकर येथे आहे. फक्त महाराष्ट्राला डिवचायचे, महाराष्ट्राला मागे ढकलायचे म्हणून वाद निर्माण करु नका. या देशात आताच्या काळात अनेक वाद निर्माण झाले आहेत. पण एकाच धर्मात आणि राज्या राज्यात वाद निर्माण करणे किती योग्य आहे?”, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी केला आहे.महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत भीमाशंकर मंदिर वसलेले आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर सहाव्या क्रमांकावर आहे. या मंदिरातील स्थापित शिवलिंगाचा आकार खूप मोठा आणि जाड आहे म्हणून त्याला मोतेश्वर महादेव असेही म्हणतात.