सावंतवाडी: सेवारत सैनिक सुभेदार सुनिल राघोबा सावंत मु. पो. कारीवडे ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग यांचा युनिटमध्ये कार्यरत असतांना दि १३ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १३.२० वाजता आकस्मित मृत्यु झाला.
सुभेदार सुनिल राघोबा सावंत सेवारत सैनिकाचे पार्थिव दि. १५ सप्टेंबर २०२३ अबहोर येथून सायंकाळी १५.०० वाजता सैनिकी वाहनाने दिल्ली विमानतळावर घेऊन आले. दिल्ली येथून विमानाने दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता मोपा विमानतळावर पोहोचले. पार्थिव गोवा येथून त्यांचे मुळगावी मु. पो. कारीवडे ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे दुपारी १:४५ वाजता अॅम्बुलन्सने आणण्यात आले. भारतीय सैन्य दलाचे वाहन आल्याबरोबर उपस्थित युवक नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरम, जब तक सूरज चांद रहेगा सुभेदार सुनिल सावंत का नाम रहेगा, सुभेदार सुनिल सावंत अमर रहे, अशा गगनभेदी घोषणा दिल्या.
कारिवडे परिसरातून हजारो युवा नागरिकांच्या उपस्थितीत सुभेदार सुनिल सावंत यांचे पार्थिव मिरवणूक मार्गाने त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आले. या प्रसंगी रस्त्याच्या दुतर्फांनी अंत्य दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. सुभेदार सुनिल सावंत यांचे पार्थिव घरी पोहोचतात पत्नी आणि मुलगी यांनी एकच आक्रोश केला. त्यांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. तेथे त्यांच्या पार्थिवाचे हजारांच्या संख्येत उपस्थित असलेल्या नागरिकांनी अंत्य दर्शन घेतले. त्याठीकाणी पार्थिवास सलामी देण्यात आली. काही वेळानंतर सुभेदार सुनिल सावंत यांच्या पर्थिवाची अंत्य यात्रा काढण्यात आली. त्यानंतर गावातिल् स्मशानभुमी पर्यंत पार्थिवाची मिरवणुक काढण्यात आली.
सदर प्रसंगी मोठया संख्येने गावातील नागरीक, शाळकरी मुले, माजी सैनिक, माजी सैनिक संघटना व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदर्गचे कर्मचारीवृंद, जिल्हाधिकारी, सावंतवाडी तालुका तहसीलदार, सावंतवाडी तालुका पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यशवंते, माजी आमदार राजन तेली, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, युवराज लखमराजे, गावचे सरपंच, गावचे उपसरपंच आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
सिंधुदुर्ग प्रशासनाच्यावतीने शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी उपस्थित राहुन सेवारत सैनिक सुभेदार सावंत सुनिल राघोबा यांचे पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर ३:२६ च्या सुमारास पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलाने मुखाग्नी दिला. या वेळेत हवेत बंदुकीचा फैरी झाडून सुभेदार सुनिल सावंत यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी मैदानात जमलेल्या हजारोंच्या जनसागराने साश्रु नयनांनी शहीद सुभेदार सुनिल सावंत यांना अखेरचा निरोप दिला.
शाहिद सुभेदार सुनिल राघोबा यांचे पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी व वडील असा परिवार आहे,