Home राजकारण शरद पवारांचा जनाधार कमी झाला की लोकशाही धोक्यात येते! गोपीचंद पडळकरांची...

शरद पवारांचा जनाधार कमी झाला की लोकशाही धोक्यात येते! गोपीचंद पडळकरांची टीका

61

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक, उद्धव ठाकरेंची खेड येथे झालेली सभा तसेच विधिमंडळाचे सुरू असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन यातून राज्याचे राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप जोरदार सुरु आहेत. यातच देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधानांना वेगवेगळ्या मुद्यावरून पत्र लिहिले आहे. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्याकडून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका होताना पाहायला मिळते. पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रासंदर्भात बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, शरद पवार यांचा जनाधार कमी झाला की, लोकशाही धोक्यात येते, हेच यांचे जुने भांडवल आहे. राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यापासून शरद पवार हे एकटेच अध्यक्ष आहेत आणि आता हे सांगतात लोकशाही धोक्यात येत आहे. या शब्दांत गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. राज्यातील हे सरकार चांगले काम करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यामार्फत राज्यात जनतेच्या हिताचे आणि तेवढ्याच प्रभावीपणे धोरण राबवले जात आहे. त्यामुळे हे सरकार गतिमान सरकार आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. तसेच शरद पवार २४ वर्षानंतर देहूला गेले आणि तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. मग २४ वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांची समाधी नव्हती का? तुकाराम महाराज नव्हते का? अशे प्रश्न पडळकर यानी उपस्थित केले आहेत. दरम्यान, कसब्यात यश मिळेल असे सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होते. पण मला त्याची खात्री नव्हती. नारायणपेठ, सदाशिवपेठ आणि शनिवारपेठ हा भाजपचा गड आहे. त्यामुळे कसब्यात विजय होईल की नाही याची खात्री नव्हती. महाराष्ट्रात लोकांना बदल हवा आहे. त्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवे. रवींद्र धंगेकर यांनी मागील तीस वर्षे जे काम केले त्याला लोकांनी मते दिली, असे शरद पवार यांनी सांगितले.