जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सात दिवस संप केला. नागरिकांना या संपामुळे खूप त्रास झाला. २० मार्चच्या रात्री जुनी पेन्शन योजना समितीचे राज्य समन्वयक विश्वास काटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर राज्य सरकारी कर्मचारी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. कुठल्याही ठोस लेखी आश्वासनाशिवाय संप मागे घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते आणि आहे. कुणीतरी समाज माध्यमांवर विश्वास काटकर यांचा संपर्क क्रमांक म्हणून मेहकर येथील पंचायत समितीतील ग्रामविकास अधिकारी तांबारे यांचा मोबाईल क्रमांक व्हायरल केला. त्यामुळे कर्मचारी त्यांना विश्वास काटकर समजून लाखोनी शिव्या देत होते.
संतप्त कर्मचारी आणि नागरिकांकडून तांबारे यांना शेकडो कॉल, व्हाट्सअॅप मेसेजेस सुरू झाले. त्यांचे व्हाट्सअॅप मेसेजेसनी भरले.दिवसभर सुरू झालेल्या या प्रकाराने तांबारे प्रचंड हैराण झाले. त्यांनी सुरुवातीला अनेकांना सांगण्याचा प्रयत्न केला की, मी काटकर नाही, तांबारे आहे. पण एकामागून एक असे शेकडो कॉल येत होते. मेसेज येत होते. असंख्य मेसेज आल्याने त्यांचा मोबाईल हँग झाला. अखेर तांबारे यांनी शेवटचा उपाय म्हणून आपला मोबाईल बंद करून ठेवला आणि सुटकेचा निःश्वास सोडला.