मसुरे प्रतिनिधी: सर्वोदय एज्युकेशन सोसायटी, मुंबई संचलित आर.ए.यादव हायस्कूल,आडवली येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या हातून त्यांच्या पालकांचे पाद्य-पूजन हायस्कूलच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलाकांत कुबल होते. प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सकपाळ सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई चे सदस्य श्री अरुण लाड ,शाळा समिती सदस्य श्री प्रमोद मुरारी सावंत व श्री चंद्रदीपक मालंडकर तसेच वैद्यकीय सल्लागार डॉ. सुरेश भोगटे , प्रशालेचे माजी विध्यार्थी श्री अनंत मालप तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते. शाळा समिती अध्यक्ष श्री कमलाकांत कुबल यांच्या संकल्पनेतून पाल्याला आपल्या पालकांप्रती नेहमी आदर राहावा,चांगल्या संस्कारांची रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये व्हावी याकरिता पाल्यांच्या हातून पालकांचे पाध्यपूजन हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. त्यानुसार सभागृहात पालक पाद्यपूजनाची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. पाल्यांनीही अतिशय विनम्र मनाने आपल्या जन्मदात्याचे पाद्यपूजन मनोभावे केले.हा प्रसंग सर्वांसाठीअतिशय भावनिक होता. निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलताना विद्यार्थ्यांनीही आपल्या मनातील या प्रशालेबद्दल,गुरुजनांबद्दल, या वास्तूबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त केली. मुख्याध्यापक सकपाळ सर यांनी विद्यार्थांना भावी जीवनासाठी शुभेच्छा देतांनाचं विध्यार्थ्यांची परीक्षेची पूर्वतयारी काय असावी.परीक्षेला निर्भयपणे कसे सामोरे जावे,सर्व विषयांचे सर्वच प्रश्न सोडवावेत त्याकरिता वेळेचे नियोजन कसे असावे याविषयी मार्गदर्शन केले.
कमलाकांत कुबल म्हणाले, आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा. आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करा.भविष्यामध्ये ज्यावेळी आपण स्वतःच्या पायावर उभे राहाल त्यावेळी या प्रशालेबद्दल,या वास्तु बद्दल आपल्या मनात असलेले ऋणानुबंध जपण्याचा प्रयत्न करा. या ऋणानुबंधातून संधी मिळेल तेव्हा उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुम्ही जरूर करावा. या कार्यक्रमानिमित्त प्रशालेचे माजी विध्यार्थी श्री अनंत मालप यांनी विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य म्हणून पेन वितरित केली. तसेच त्यांनी चेक द्वारे कै. एकनाथ साटम यांच्या स्मरणार्थ ५ हजार रुपये कायम ठेव म्हणून देणगी दिली. सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ.पराडकर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.वारंग मॅडम यांनी मानले.