देशातील आघाडीच्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांवरून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी चिंता व्यक्ती केली आहे. आपल्या संस्थांचे नेमके कुठे चुकत आहे? की ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्वत:चे आयुष्य संपवावेसे वाटते. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते नॅशनल अॅकाडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च या संस्थेच्या पदवीदान समारंभाच्या वेळी बोलत होते. भारतात सामाजिक बदल घडवण्यासाठी न्यायाधीशांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी यावेळी केले. आयआयटी मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी दर्शन सोलंकी या दलित विद्यार्थ्यांने आत्महत्या केली होती. त्याचा उल्लेख करून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, वंचित समूह घटकातील विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याच्या घटना सामान्य होत आहेत. गेल्या वर्षी ओडिशामध्ये नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थाने आत्महत्या केल्याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली. अशा विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचा विचार करून मन व्यथित होत असल्याचेही ते म्हणाले.
भारतात सामाजिक बदल घडवण्यासाठी न्यायाधीश न्यायालयात आणि न्यायालयाबाहेर संवाद साधण्यात मोठी भूमिका बजावू शकतात. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.वंचित घटकांतील विद्यार्थ्यांबाबत होणाऱ्या घटना, त्यांच्या आत्महत्या होणे ही बाब आता नेहमीची झाली आहे. अशा घटना केवळ आकडय़ांपुरत्या मर्यादित नाहीत. या घटना म्हणजे कधी कधी शेकडो वर्षांच्या संघर्षांची कहाणी असते. हा प्रश्न सोडवायचा असेल तर, मला वाटते सर्वप्रथम आपण ही समस्या ओळखायला आणि मान्य करायला पाहिजे. मी वकिलांच्या मानसिक आरोग्याबाबत आग्रही असतो. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्यही तेवढेच महत्त्वाचे आहे.