केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज नाशिक दौऱ्यावर असून नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने ऑल व्हील डिस्प्ले संकल्पनेतून नाशिक शहरात पहिल्यांदाच ऑटो अँड लॉजिस्टिक एक्स्पोचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले की, “लवकरच काश्मीर आणि कन्याकुमारी या नेटवर्कला नाशिक जिल्हा जोडला जाणार आहे. सद्यस्थितीत डिझेल हे प्रदूषणकारी आणि कॉस्टली इंधन आहे. इलेक्ट्रिक ट्रक फारच स्वस्त आहे. जिथे १०० रुपये डिझेल लागते, तिथे १० रुपये इलेक्ट्रिक लागेल. यामुळे येणाऱ्या काळात आपली लॉजिस्टिक कॉस्ट जगात सर्वात जास्त असणार आहे. यानंतर सर्व ट्रक एलएनजी आणि सीएनजी, इथेनॉल आणि बायोगॅसवर चालणार आहेत. मला खूप आनंद आहे की, वाहतुकीमध्ये परिवर्तन होत आहे. डिझेल ट्रक फार काही परवडत नाही. येणाऱ्या काळात ट्रान्सपोर्ट असोसिएशनने शहराच्या बाहेर ट्रक थांबवण्यासाठी जागा तयार करावी. ज्यामुळे ट्रॅफिक होणार नाही. नाशिकमधील द्वारका येथे डबल डेकर ब्रिज होईल. लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून नाशिकला बनवण्यासाठी ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पुढाकार घ्यावा. यासाठी नाशिक महापालिकेला याबाबत प्रस्ताव द्यावा, म्हणेजच बाहेरच्या बाहेर ट्रक थांबतील आणि वाहतूक कोंडी होणार नाही, आमचा विभाग त्यासाठी प्रयत्न करेल, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.काश्मीर ते कन्याकुमारी जाण्यासाठी महाराष्ट्रातील सोलापूर त्यानंतर कन्नूर, त्रिवेंद्रम, हैदराबाद, बंगलोर, कन्याकुमारी असा प्रवास होत होता. मात्र आता मुंबई पुण्याला किंवा सोलापूरला जायची गरज नाही. आता नाशिकवरुन कन्याकुमारी प्रवास करता येणार आहे. त्यामुळे थेट नॉर्थचे साऊथशी कनेक्शन नाशिकवरुनहोणार आहे. त्यामुळे लवकरच काश्मीर आणि कन्याकुमारी या नेटवर्कला नाशिक जिल्हा जोडला जाणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. त्यामुळे आता काश्मीर ते कन्याकुमारी सोलापूर नाहीतर नाशिकवरुन देखील जाता येणार आहे.