Home स्टोरी ललितापंचमीला राज्यातील ८५ शहरात सामूहिक नामस्मरण सोहळा!

ललितापंचमीला राज्यातील ८५ शहरात सामूहिक नामस्मरण सोहळा!

137

अक्कलकोट नगरीत स्वामी समर्थ आगमन दिनाचे औचित्य साधून १९ रोजी सोहळा!

 

मसुरे प्रतिनिधी:

 

श्री स्वामी समर्थ यांच्या अक्कलकोट नगरीतील आगमन दिनानिमित्त (ललिता पंचमी) सामुदायिक नामस्मरण करण्यात येणार आहे. राज्यभरातील ८५ शहरात गुरुवार, १९ ऑक्टोबर रोजी ५.२५ वाजता लाखोंच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याची माहिती डॉ. मनोहर मोरे यांनी दिली.

ललिता पंचमीला स्वामींचे अक्कलकोट येथे आगमन झाले. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे व श्री स्वामीभक्त चोळाप्पा महाराज यांचे वंशज अण्णू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षांपासून समर्थ नगरी परिवार अक्कलकोटच्या माध्यमातून राज्यभरात स्वामी नामप्रसार सेवा उत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. या दिवशी विश्व शांती व मन शांतीकरिता सामुदायिक नामस्मरण करण्यात येणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५. २५ वाजता एकाच दिवशी एकाच वेळेस राज्यभरात हा सोहळा साजरा होणार आहे. यात लाखो स्वामीभक्त सहभागी होतील.

स्वामींचे आगमन अक्कलकोटकरांसाठी भाग्याचे ठरले आहे. त्यांनी प्रदीर्घकाळ अक्कलकोट पावनभूमीमध्ये व्यतीत केला. आपला देहत्याग याच ठिकाणी वटवृक्षाखाली ठेवला. त्यांची समाधी देखील येथेच आहे. त्यामुळे ललित पंचमी हा दिवस अक्कलकोटकराकरिता महत्वाचा आहे. अक्कलकोट येथील लोकापुरे हॉल येथे सामुदायिक नामस्मरण होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता अक्कलकोट येथील नागरिक व व्यापाऱ्यांनी दुकानात व घरात महाराजांच्या फोटोचे पूजन करून महाराजांचे स्वागत करावे, असे आवाहन वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले आहे.

 

कर्नाटक, गोवा, जम्मूतही होणार सोहळा… 

 

अक्कलकोट, सोलापूरसह वालचंद नगर, पुणे, हडपसर विवेवाडी, धनकवडी, गणेश नगर, निगडी, डेक्कन, सातारा, तासगाव, मिरज, म्हैसाळ, कोल्हापूर, कराड, गारगोटी ,चांदेकरवाडी, देवगड हरपिडमठ, रत्नागिरी, चिपळूण, पालघर, भुईगाव वसई, बोरिवली, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर , चंद्रपूर, नांदेड, धुळे आदीसह कर्नाटकातील चिकोडी, शहाबाद गोवा राज्यातील फोंडा गाव, राजस्थान व हरियाणा तथा जम्मू येथे हा उत्सव एकत्रित नामस्मरणामध्ये साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.