Home स्टोरी लंडनमधील वस्‍तूसंग्रहालयात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख: भारतीय युवतीच्‍या आक्षेपानंतर प्रशासन करणार सुधारणा!

लंडनमधील वस्‍तूसंग्रहालयात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख: भारतीय युवतीच्‍या आक्षेपानंतर प्रशासन करणार सुधारणा!

57

सिंधुदुर्ग: ब्रिटनमधील लंडन येथील ‘व्‍हिक्‍टोरिया अँड अल्‍बर्ट म्‍युझिअम’मध्‍ये प्रदर्शनासाठी ठेवलेल्‍या वाघनखांच्‍या बाजूला असलेल्‍या माहितीफलकावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख करण्‍यात आला आहे. रायगड जिल्‍ह्यातील रोहा येथील कु. वनश्री समीर शेडगे या युवतीने यावर आक्षेप घेत तेथील व्‍यवस्‍थापकांना ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा उल्लेख करण्‍याची सूचना केली. यावर पालट करण्‍याची सिद्धता या संग्रहालयाच्‍या व्‍यवस्‍थापकांनी दर्शवली आहे. कु. वनश्री यांनी याविषयीची माहिती सामाजिक माध्‍यमांद्वारे दिली आहे.

१. कु. वनश्री आणि त्‍यांच्‍या दोन बहिणी ३१ मार्च या दिवशी ‘वव्‍ही-अँड-ए-म्‍युझिअम’ येथे गेल्‍या होत्‍या. या संग्रहालयातील खोली क्रमांक ४१ मध्‍ये प्रदर्शनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ठेवण्‍यात आली आहेत.

२. त्‍यांची माहिती देतांना ‘वर्ष १६५९ मध्‍ये शांतता प्रस्‍थापित करण्‍याच्‍या बहाण्‍याने विजापूरहून पाठवलेल्‍या दूताला खाली पाडून मराठा शासक शिवाजी एका हत्‍येच्‍या प्रयत्नातून वाचले. बचावासाठी त्‍यांनी हे शस्‍त्र वापरले होते’, असा उल्लेख करण्‍यात आला आहे.

३. कु. वनश्री आणि त्‍यांच्‍या बहिणी यांनी येथील साहाय्‍यक कक्षावर असलेल्‍या कर्मचार्‍यांकडे याविषयीची माहिती दिली, तसेच त्‍यांच्‍याकडे प्रतिक्रिया नोंदवहीची मागणी करून त्‍यामध्‍ये स्‍वत:चे मत नोंदवलेे. यामध्‍ये ‘छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्‍या देशाचे प्रतिनिधित्‍व करतात. त्‍यांना भारतामध्‍ये कधीही एकेरी नावाने संबोधले जात नाही. त्‍यांचा एकेरी उल्लेख करणे हा त्‍यांचा आणि आमच्‍या भारत देशाचा अनादर आहे. त्‍यामुळे माहिती फलकावर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा उल्लेख करावा’, असे मत नोंदवले.

४. या प्रतिक्रियेखाली कु. वनश्री यांनी स्‍वतःचा ईमेल पत्ताही दिला होता. ५ एप्रिल या दिवशी या संग्रहालयातील भारतीय प्रतिनिधी दिवियान पटेल यांनी कु. वनश्री यांना ईमेलद्वारे उत्तर दिले.

त्‍यात म्‍हटले आहे, ‘‘वर्ष २०२४ मध्‍ये संग्रहालयाच्‍या नूतनीकरणासाठी आम्‍ही गॅलरी बंद करणार आहोत. त्‍या वेळी संग्रहातील सर्व फलक पालटणार आहोत. त्‍या वेळी तुमची सूचना विचारात घेतली जाईल. यामध्‍ये कुणाचाही अनादर करण्‍याचा आमचा हेतू नव्‍हता.’’