रायगड: येथील धामणसई स्मशानभूमीत आणि शाळेत गुप्तधनासाठी काळी बाहुली, लिंबू, सुई, हळद-कुंकू, फुलांची विचित्र मांडणी करून मांत्रिकांनी गळ्यात कवट्यांची माळ घालून ‘ओम फट् स्वाहा’ मंत्रजप केला. या प्रकरणी शाळा आणि स्मशान येथे जादूटोणा करणार्या टोळीतील ७ जणांना पोलिसांनी जादूटोणा कायद्यांतर्गत अटक केली असून २ सूत्रधार पसार झाले आहेत. संतोष पालांडे, प्रदीप पवार, प्रवीण खांबल, सचिन देसाई, दीपक कदम, मिलिंद साळवी, राजेंद्र तेलंगे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
धामणसई स्मशानभूमीत आणि शाळेत काही व्यक्ती तंत्र-मंत्र उच्चारत अघोरी विधी करत असल्याचे ग्रामस्थांना समजले. चौकशी केल्यावर त्यांनी दिशाभूल करणारी उत्तरे दिली. ग्रामस्थांनी पोलिसांना कळवले. पोलीस तेथे पोचण्यापूर्वी गळ्यात कवट्यांची माळ घातलेले दोघे जण पळून गेले.