बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाला आजपासून पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. रिफायनरीच्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने प्रशासन आधीच अलर्ट मोडवर आहे. रिफायनरीला विरोध करणाऱ्या रिफायनरी विरोधकांना पोलिसांनी नोटीसा पाठवल्या आहेत. पोलिसांनी ४५ रिफायनरी विरोधकांना १४४ CRPC अन्वये प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. काहींना बारसू पंचक्रोशीत तर काहींना जिल्हा बंदीची नोटीस बजावण्यात आली आहे. सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर २२ एप्रिल ते ३१ एप्रिल या कालावधीसाठी प्रतिबंधित आदेश लागू करण्यात आले आहेत. पोलिसांचा या भागात कडेकोट बंदोबस्त असणार आहे. या बंदोबस्तासाठीच आज पोलिसांची एक गाडी राजापूरच्या मार्गाला निघाली होती. पण कशेळी बांध येथे पोलिसांची गाडी पलटी झाली. या घटनेत १६ पोलीस जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बारसू आणि परिसरात १४४ कलम या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी म्हणून बारसू आणि परिसरात १४४ कलम लावण्यात आले आहे. सर्वेक्षण होणाऱ्या भागांमध्ये कुणालाही प्रवेश करता येणार नाही. त्यासाठी मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. प्रशासकीय लोकांना परवानगी दिलेल्या व्यतिरिक्त कोणीही प्रवेश करू शकत नाही. जर कोणाकडूनही नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली
रिफायनरीला विरोध करणाऱ्यांसोबत प्रशासनाची चर्चा निष्फळ
रिफायनरी विरोधकांसोबत प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी चर्चा केली. पण बैठक निष्पळ ठरली. बारसू रिफायनरीसाठी आज सर्वेक्षणाला सुरुवात होणार होती. त्या विरोधात रिफायनरी विरोधक सध्या रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत. वाढत असलेली उष्णता, त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. या शक्यतेने तुम्ही आंदोलन करू नकात असं समजावण्यासाठी तहसीलदार आणि प्रांताधिकारी थेट बारसूच्या सड्यावर पोहोचल्या. इथं रिफायनरी विरोधक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या जवळपास अर्धा तास चर्चा झाली.आंदोलन करू नका अशी भूमिका प्रशासनाकडून घेऊन हे दोन अधिकारी या ठिकाणी पोहोचले होते. मात्र रिफायनरी विरोधकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेत नाही, रिफायनरी रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही, अशी भूमिका रिफायनरी विरोधकांनी मांडली. आंदोलकांची समजूत काढून तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी मागार घेतली.