Home स्पोर्ट राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास गोवा सज्ज!

राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास गोवा सज्ज!

77

गोवा:एप्रिल (वार्ता.): ३७ व्या राष्ट्रीय खेळांच्या आयोजनासाठी गोवा सज्ज आहे. या स्पर्धांसाठी लागणार्‍या पायाभूत सुविधा आधीच सिद्ध आहेत. राहिलेली किरकोळ कामे १५ जुलैपर्यंत पूर्ण होतील, असे गोव्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. या क्रीडा स्पर्धांच्या सिद्धतेची पहाणी करण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेचा एक गट गोव्यामध्ये पहाणी करून गेला आहे. पुढच्या टप्प्यातील कामे पूर्ण झाल्यानंतरची पहाणी करण्यासाठी २७ ते २९ मे या काळात दुसरा गट गोव्यात येणार आहे. आज व्यवस्थापन आणि नियोजन यांच्या दृष्टीने भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी.टी. उषा आणि इतर मुख्य पदाधिकारी यांच्या समवेत बैठक पार पडली.या वेळी पी.टी. उषा म्हणाल्या की, गोव्याने या स्पर्धांचे उत्तरदायित्व घेतल्याचा मला पुष्कळ आनंद आहे. आम्ही गोव्याच्या क्रीडामंत्र्यांसमवेत यावर सविस्तर चर्चा केली आहे आणि त्या अनुषंगाने कामाला आरंभ झाला आहे. मला विश्वास आहे की, हे आयोजन उत्कृष्ट होईल.मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, २३ किंवा २४ ऑक्टोबर या दिवशी पंतप्रधान मोदी यांच्या उपलब्ध वेळेनुसार राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन सोहळा फातोर्डा स्टेडियमवर होणार आहे. भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्याची आम्हाला पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. या क्रीडा स्पर्धा १० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहेत. गोव्यातील युवकांनाही पहिल्यांदाच अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

गोव्याच्या पारंपरिक ‘लगोरी’ खेळाला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्थान.

गोव्याचा पारंपरिक ‘लगोरी’ खेळ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये समाविष्ट झाला आहे. गोमंतकियांनाही या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल. गोव्यात केवळ आध्यात्मिक पर्यटनच नव्हे, तर गोव्यात आता क्रीडा वातावरणही सिद्ध होत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी स्पर्धेत ३८ क्रीडा प्रकार आहेत आणि त्यांची ठिकाणेही ठरलेली आहेत, अशी माहिती दिली.