Home स्टोरी राजस्थानात आश्रयास आलेल्या पाकिस्तानी हिंदूंचे प्रचंड हाल!घर व पाण्याची टाकी उद्ध्वस्त, कडक...

राजस्थानात आश्रयास आलेल्या पाकिस्तानी हिंदूंचे प्रचंड हाल!घर व पाण्याची टाकी उद्ध्वस्त, कडक उन्हात खाट हेच छत

118

जोधपूर: (वार्ता 2 मे):
पाकिस्तानातील अत्याचारांना कंटाळून भारताच्या आश्रयास आलेल्या पाकिस्तानी हिंदूंचे हाल सुरूच असून, प्रशासनाच्या संवेदनशून्य धोरणामुळे जोधपूरमध्ये ऐन उन्हाळ्यात बेघर होण्याची वेळ त्यांच्यावर ओढवल्याचे संतापजनक वृत्त आहे.

पाकिस्तानात हिंदूवरील अत्याचारांना कंटाळून सुमारे चार महिन्यांपूर्वी २३ वर्षीय रामचंद्र भिल व त्याचे कुटुंबीय भारताच्या आश्रयास आले होते. अनेक दिवसांच्या प्रवासानंतर तो व त्याचे कुटुंबीय राजस्थानमधील जोधपूरमधील चोखा गावात दाखल झाले. आयुष्यभराची कमाई (70 हजार रुपये) देऊन त्याने येथेच जमिनीचा तुकडा विकत घेतला व त्यावर घर बांधून राहायला सुरुवात केली. आता भिल बेघर झाला आहे. राजस्थानातील भयंकर कडक उन्हात खाट हेच या खुटुंबाचे एकमेव छप्पर आहे. भिल हा त्या पाकिस्तानी िंहदूंपैकी एक आहे, ज्यांची घरे 24 एप्रिल रोजी जोधपूर विकास प्राधिकरणाने बुलडोझरने उद्ध्वस्त केली होती.

घरांवर बुलडोझर चालवल्याने येथे राहणार्‍या पाकिस्तानी हिंदूंची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. सारे काही विस्कळीत झाले आहे. ऐन कडक उन्हाळ्यात त्यांना उघड्यावर राहावे लागत आहे. मुलांना एक वेळचे भोजन सोडाच पिण्याचे पाणीही मिळत नाही, ही भीषण वस्तुस्थिती आहे. चारही ठिकाणी फाटलेल्या ताडपत्री, रिकामी भांडी आणि इतर वस्तू आजूबाजूला पसरलेल्या आहेत. आम्ही जमीन विकत घेऊन घर बांधल्याचे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे. तर, त्यांच्याकडे जमिनीचे कोणतेही कागदपत्र नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

प्रशासकीय कारवाईनंतर विविध प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट देऊन पीडितांची स्थिती जाणून घेतली. आपण चार महिन्यांपूर्वी प्रवासी व्हिसावर भारतात आलो होतो, आता त्या व्हिसाची मुदत दीर्घ काळासाठी वाढविण्यात आली आहे, असे रामचंद्र भिलने सांगितले. मी आणि माझ्या पत्नीने आयुष्यभराच्या कमाईतून येथे बांधलेले घर आता राहिले नाही, प्रशासनाने ते उद्ध्वस्त केले, असे त्याने सांगितले.

प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे रामचंद्र व त्यांचे कुटुंबीय कडाक्याच्या उन्हात खाटांचे छत बनवून राहात आहेत. ते खाट लाकडाच्या साहाय्याने तिरपी करतात आणि संपूर्ण कुटुंबीय त्याच्या सावलीत दिवसभर राहते. पाण्यासाठी वापरण्यात येणारी सिमेंटची टाकीही प्रशासनाने तोडून टाकली. भिलच्या कुटुंबाला पाणी आणि अन्नासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. आम्ही भारतात नाही तर, मग कुठे राहणार असा प्रश्नही त्यांनी विचारला.
फोटो: खाट व कागदाची झोपडी बनवून निरुपायाने राहणारे शरणार्थी हिंदू