उरण: यशश्री शिंदे (वय २१ वर्षे) या तरुणीची दाऊद शेख याने अत्यंत विकृत आणि निर्घृणपणे हत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर २८ जुलै या दिवशी येथील गांधी चौकात शेकडो हिंदूंनी आंदोलन केले. या आंदोलनाचे रूपांतर मोर्च्यामध्ये होऊन पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला. या आंदोलनात मोठ्या संख्येने युवती आणि युवक सहभागी झाले होते. युवतींनी ‘राजकारण न करता आरोपीला फाशी द्या’ अशी जोरदार मागणी या वेळी केली. ‘यशश्रीला न्याय मिळाला पाहिजे’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. या वेळी मुसलमान महिलांनी माध्यमांसमोर जाऊन ‘हे लव्ह जिहाद वगैरे काही नाही’ अशा प्रतिक्रिया देऊन ‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) पसरवण्याचा प्रयत्न केला’, असे आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्यक्षदर्शी हिंदुत्वनिष्ठांनी सांगितले. उरण येथील आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली काही हिंदूही सहभागी झाले होते.
उरण येथे लव्ह जिहादच्या घटनेत तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्यानंतर हिंदूंचा रोष ओढवून घेण्यापासून वाचण्यासाठी येथे धर्मांधांनी मोठा कावेबाजपणा केला. एक तर ‘आरोपी पकडला गेला’ अशी अफवा पसरवण्यात आली. प्रत्यक्षात आरोपी दाऊद शेख हा उत्तरप्रदेशात पळून गेल्याचे समजते. दुसरे म्हणजे अनेक धर्मांध महिला या आंदोलनात सहभागी झाल्या. जेव्हा माध्यमांचे प्रतिनिधी तेथे आले, तेव्हा त्यांच्यासमोर जाऊन त्या म्हणाल्या, ‘‘याला धार्मिकतेचा रंग देऊ नका. हे लव्ह जिहाद वगैरे काही नाही. आमचाही याला विरोध आहे. आरोपीला शिक्षा द्या.’’ घाबरलेल्या धर्मांधांनी हिंदूंचा उद्रेक होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगून आधीच अशा प्रकारे धर्मांध महिलांना पुढे पाठवून सारवासारव केली, असेच यावरून लक्षात आले.
पोलिसांचा नाकर्तेपणा!
यशश्री बेपत्ता झाल्याच्या दिवशी, म्हणजे २५ जुलै या दिवशी दुपारी ३ वाजता तिने एका मैत्रिणीला ‘मी संकटात आहे. मला कुणीतरी साहाय्य करा’, असे सांगितले होते. ‘त्याची माहिती पोलिसांना देऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले’, असा आरोप यशश्रीच्या पालकांनी केला आहे. उरण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कोटे-पाटील यांनी सांगितले, ‘‘लव्ह जिहादचा या घटनेशी काहीही संबंध नाही.’’