Home स्टोरी रत्नागिरी जिल्ह्यात दरडप्रवण भागांतील १ सहस्र ७०१ जणांचे स्थलांतर!

रत्नागिरी जिल्ह्यात दरडप्रवण भागांतील १ सहस्र ७०१ जणांचे स्थलांतर!

116

२६ जुलै वार्ता: जुलै मासात सर्वत्र पूर परिस्थिती उद्भवली आहे. इरशाळवाडीतील दुर्घटनेनंतर सतर्कता म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील १५० दरडप्रवण (दरडप्रवण म्हणजे दरड कोसळण्याची शक्यता असणारे क्षेत्र) गावांतील ५७१ कुटुंबांमधील १ सहस्र ७०१ लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या दीड मासात घरे, गोठे, सार्वजनिक मालमत्तांचे १ कोटी ३५ लाख रुपयांची हानी झाली आहे.जिल्ह्यात मागील १५ दिवसांत मुसळधार पाऊस पडला आहे. पावसासमवेत वेगवान वार्‍यामुळे झाडे पडून घरा-गोठ्यांची हानीही झाली आहे. पुरामुळे चिपळूण, खेड, दापोली, राजापुरात हानीची नोंद झाली आहे. यंदा सर्वाधिक धोका भूस्खलनाचाच आहे. जिल्ह्यातील १ सहस्र ७०१ लोकांचे स्थलांतर करण्यात आले. तसेच पुरामुळे धोका होऊ शकतो, अशा २४ गावांतील १३० कुटुंबांतील ४७७ लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे एकूण ७०१ कुटुंबांतील २ सहस्र ०७८ लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.स्थलांतर करतांना अनेकांनी त्यांच्या नातेवाइकांकडे रहाण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांचे स्थलांतर समाजमंदिर, शाळेत करण्यात आले आहे, अशा लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी संबंधित तहसीलदार कार्यालयाकडे २ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. ‘पुरवठा विभागाकडून त्यांना धान्य देण्याची व्यवस्था करावी, तसेच आवश्यक तेथे शिवभोजन थाळीचा वापर करावा’, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.