रत्नागिरी – देशभरात एकूण ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात महाराष्ट्रातील ५५ नदीपट्ट्यांचा समावेश आहे. यात रत्नागिरीतील वाशिष्ठी, सावित्री आणि मुचकुंदी हे जिल्ह्यातील ३ नदीपट्टे प्रदूषित असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून पुढे आले आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जल गुणवत्ता व्यवस्थापन विभागाने ‘पोल्युटेड रिव्हर स्ट्रेचेस फॉर रिस्टोरेशन ऑफ वॉटर क्वॉलिटी’ हा अहवाल बनवला आहे. त्यात सर्वाधिक ५५ प्रदूषित नदीपट्टे महाराष्ट्रात, त्या खालोखाल मध्यप्रदेशमध्ये १९, बिहार आणि केरळमध्ये १८, कर्नाटक आणि उत्तरप्रदेशमध्ये १७ नदीपट्टे प्रदूषित आहेत. वर्ष २०१८ च्या तुलनेत यावेळी नद्यांतील प्रदूषणात घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
शहरे आणि उद्योगांमधील सांडपाणी नदीत सोडले जाते. यातील रासायनिक घटक, तसेच इतर टाकाऊ वस्तू यांमुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होते. पर्यायाने त्या भागातील नदीच्या परिसंस्था धोक्यात येतात आणि त्याचा दुष्परिणाम निसर्ग अन् मानवी आरोग्यावर होत असल्याचे पुढे येत आहे. यामध्ये वाशिष्ठी नदीतील दळवटणे ते खेर्डी, तर सावित्री नदीतील दादली ते मुठावली या पट्ट्यांचा प्रदूषित नदीपट्ट्यांमध्ये समावेश आहे. ‘चिपळूणच्या वाशिष्ठी नदीत औद्योगिक आणि शहरांचे सांडपाणी हे दोन्ही सोडले जात आहे. त्यामुळे नद्या वाचवायच्या असतील, तर जनतेनेचे पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे’, असे वाशिष्ठी नदीचे समन्वयक शाहनवाज शाह यांनी म्हटले आहे.