Home स्टोरी यशवंतगडाजवळ अवैध उत्खनन केल्याच्या प्रकरणी १० जणांना एकूण २६ लाख रुपये दंड!

यशवंतगडाजवळ अवैध उत्खनन केल्याच्या प्रकरणी १० जणांना एकूण २६ लाख रुपये दंड!

40

सिंधुदुर्ग:– राज्य संरक्षित स्मारक असलेल्या तालुक्यातील यशवंतगडाच्या तटबंदीजवळ अवैधपणे गौण खनिजाचे (माती) उत्खनन केल्याच्या प्रकरणी एकूण २६ लाख ७१ सहस्र २०० रुपये स्वामित्वधन (रॉयल्टी) १५ दिवसांत भरावे, तसेच ही रक्कम भरल्याचे चलन (पावती) कार्यालयाला सादर करावे. दिलेल्या मुदतीत ही रक्कम न भरल्यास महाराष्ट्र भूमी महसूल अधिनियमांतील तरतुदीनुसार ही रक्कम भूमी महसुलाची थकबाकी म्हणून सक्तीने वसूल करण्यात येईल, असा आदेश वेंगुर्ला तहसीलदार प्रविण आबाजी लोकरे यांनी या प्रकरणातील संबंधित १० जणांना दिला आहे.

गडाजवळील अवैध बांधकामाच्या विरोधात आवाज उठवणारे आणि प्रसंगी दीर्घकालीन उपोषण करणारे शिवप्रेमी तथा भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण प्रांताचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन बापू रेडकर, भूषण विलास मांजरेकर आणि त्यांचे सहकारी यांच्या लढ्याला पहिल्या टप्प्यात यश आले आहे.

वेंगुर्ला तहसीलदार प्रविण लोकरे

या आदेशात तहसीलदार लोकरे यांनी म्हटले आहे की,

१. यशवंतगडालगत असलेल्या श्री गणपति मंदिराच्या तटाला लागूनच तटबंदीच्या भरावाच्या मातीचे अनधिकृतपणे उत्खनन करून सपाटीकरण आणि बांधकाम चालू करण्यात आले आहे.

२. या संरक्षित स्मारकाच्या नियंत्रित क्षेत्रात कोणतेही उत्खनन, कोणतेही बांधकाम करण्यासाठी पुरातत्व खात्याची अनुमती घेणे आवश्यक असल्याचे कळवूनही संरक्षित क्षेत्राच्या तटबंदीच्या भरावाच्या मातीचे उत्खनन करण्यात आले.

३. अवैधरित्या करण्यात आलेल्या बांधकामाच्या विरोधात श्री. राजन रेडकर आणि श्री. भूषण मांजरेकर यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार वस्तूस्थितीची पहाणी करण्यात आली. यानुसार मौजे सुकळभाट, वेंगुर्ला येथील सर्वेक्षण क्रमांक ३४, हिस्सा क्रमांक ०, एकूण क्षेत्र ०.४०.०० हेक्टर या क्षेत्रामध्ये ४७७ ब्रास मातीचे अवैध उत्खनन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

४. यासाठी श्रीमती प्रीती श्रीवास्तव, पुणे; दिलिप विष्णु सावंत, रेडी; श्रीमती अनिता कृष्णा सावंत, रेडी; सागर कृष्णा सावंत, रेडी; श्रीमती कीर्ती कालिदास बांदेकर, शिरोडा; श्रीमती अर्चना अनंत तेंडुलकर, कणकवली; श्रीमती उज्वला उल्हास कोचरेकर, खानोली; प्रदीप विनायक दळवी, सुकळभाट; सदानंद विनायक दळवी, सुकळभाट आणि नीळकंठ विनायक दळवी, सुकळभाट यांच्याकडून उपरोक्त रक्कम वसूल करण्यात यावी.

५. यामध्ये शासकीय दरानुसार प्रती ब्रास ६०० रुपये याप्रमाणे ४७७ ब्राससाठी २ लाख ८६ सहस्र २०० रुपये आणि दंड म्हणून बाजारभावाच्या पाचपट यानुसार प्रती ब्रास ५ सहस्र रुपये प्रमाणे ४७७ ब्राससाठी २३ लाख ८५ सहस्र रुपये, असे एकूण २६ लाख ७१ सहस्र २०० रुपये भरावेत.