म्हसळा प्रतिनिधी: म्हसळाचे जागृत देवस्थान श्री धाविर देव महाराज मंदिराचे ग्रामस्थांनी पाच वर्षा पूर्वी चैत्र शुध्द त्रयोदशीला जीर्णोद्धार सोहळा संपन्न केला होता. तेव्हा पासुन शहरात श्री धाविर देव महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करून या वर्षी त्याच शुभ मुहूर्तावर म्हसळा शहरात दिनांक ४ एप्रिल रोजी भव्य शोभा यात्रा संपन्न झाली.


वाजत गाजत भाविक भक्तांनी शोभा यात्रेत सहभागी होत श्री धाविर देव पालखीचे पुजन करून आशीर्वाद घेतले.पालखी आगमन स्वागत करण्यासाठी शहर वासियानी दारोदारी आणि रस्त्यावर रांगोळी काढून मनमोहक वातावरण तयार केल्याचे पहायला मिळाले.म्हसळयाचे श्री धाविर देव मंदिर पूर्वमुखी असून इतिहास कालीन नोंद आहे.रोजच धाविर देव मंदिरात महाराजांना सूर्यदर्शन होते.मंदिरात नव्याने ग्रामस्थ, देव मानकरी यांचे शुभ हस्ते श्री धाविर देव,रवळनाथ,अवळनाथ,बापूजी,जोगेश्वरी,भैरी आणि काळेश्री देवतेचे चांदीचे मुखवटा तयार करून त्यांचे विधीवध प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात आला. म्हसळा करांचे श्री धाविर देव हे जागृत स्थान आहे.यातील काही देवतांचे देवस्थान शहरातील गवळवाडी,दुर्गवाडी,चिराठी गाव वस्तीच्या डोंगर कपारीत रमणीय ठिकाणी आहेत.म्हसळा येथे चैत्र पौर्णिमेला श्री धाविर देव महाराज यात्रेचे आयोजन करून या देवस्थानांना मानाने पालखीतून वतनदार,सालकारी,कुलकर्णी आणि ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने,भक्ती भावाने मूळ देवस्थानी(श्री धाविर मंदिर)आणले जातात.म्हसळा येथिल श्री धाविर देव मंदिर यात्रेपासून तालुक्यातील इतर ठिकाणच्या यात्रांना सुरुवात होते त्यामुळे म्हसळा येथील यात्रेला अनन्य साधारण महत्व आहे.दरवर्षी चैत्र पौर्णिमेला संपन्न होणाऱ्या श्री धाविर महाराज यात्रेत पूर्वी तालुक्यातील ८४ गावातील लोकांचा सहभाग आसे,भाविक घुंगुर,लाइट आणि विविध पद्धतीने आकर्षक सजविलेल्या काठ्या घेऊन यात्रेत सहभागी होत असत परंतू मागील काहीवर्षांपासून यात्रेला येणाऱ्या काठ्यांचा ओघ काहीसा कमी झाल्याचे चित्र पाहवयास मिळते.त्याची अनेक कारणे असू शकतात,त्यामध्ये वाढती महागाई,ग्रामस्थ्यांची मुंबई सारख्या शहराकडे शिक्षण अगर कामानिमित्त जाण्यासाठी पसंती अशी अनेक कारणे या मागे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.सर्व समाज,सर्वधर्मीय बांधव यात्रेत सहभागी होऊन गावाच्या एकतेचे व अखंडतेचे प्रतिक दर्शविणारा हा अविस्मरणीय प्रसंग सर्वांच्याच कायम स्मरणात रहातो.केलटे गावातील काठीला यात्रेत प्रथम स्थान असून या काठीची गाव देवतेची मानाची भेट होळीच्या खाचरात होते.त्यानंतर इतर गावाहून आलेल्या काठयांची गळाभेट श्री धाविर देव मंदिरात होते.श्री धाविर देव नवसाला पावणारे दैवत असून श्री धाविर देवांमुळे गावावर,शहरात कोणत्याही प्रकारचे संकट,कुठलीही साथ आगर कोणत्याही प्रकारची लागण होत नाही असे जुने-जाणते लोक आजही ठामपणे सांगतात.शहरातील कुंभार समाजाकडे या देवळाच्या पूजेअर्चेचे काम पूर्वापार असून शहरातील कुंभार समाजातील म्हशीलकार बंधू,वतनदार,सालकारी,मानकरी आणि ग्रामस्थ यात्रेची संपूर्ण जाबाबदारी पार पाडतात.यात्रेच्या मध्यरात्री गावातील रोहिदास समाजातील भक्तगणांकडून बळ काढून शीवबांधणी (वेशबांधणी)हा सोहळा श्रद्धेने पार पाडण्याची परंपरा आजही सुरु आहे. यात्रेसाठी पोलिस यंत्रणा आपली भूमिका अतिशय चोख आणि जबाबदारी पूर्वक पार पाडतात.दिवस रात्र संपन्न चैत्र पौर्णिमा यात्रेत म्हसळा नगर पंचायत आणि विज वितरण कंपनी दिवाबत्तीची व्यवस्था तर जैन बांधवांतर्फे भाविक भक्तांना शुद्ध आणि थंड पाणी पुरवठा व्यवस्था करण्यात येते.