सिंधुदुर्ग: या वर्षाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक अनुयायी नवी मुंबईतील खारघरमध्ये आले होते. मात्र हा सोहळा अति उन्हात घेण्यात आला होता. यामुळे उष्माघाताने तब्बल १४ जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. त्या दिवशी ४२ डिग्री सेल्सिअस तापमान होतं. या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या अनुयायांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. मात्र, आता या घटनेनंतर मृत श्री सदस्यांचा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. त्यात धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. १४ पैकी १२ सदस्यांनी सात तास काहीच खाल्ले नव्हते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. उपाशीतापाशीच ते रणरणत्या उन्हात बसून होते. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तर, दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे यातील काहींना आधीपासून व्याधी होत्या. ज्यामुळे वेळेवर न खाणं आणि प्रचंड ऊन याची भर पडली, आणि त्यांचा मृत्यू झाला. असं पोस्ट मॉर्टम करणाऱ्या एका डॉक्टरनं सांगितलं. तसेच, “या यावेळी श्री सदस्यांना सोबत येताना जेवण, पाण्याची बॉटल आणण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या.” एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने या बद्दल खुलासा केला आहे.