Home क्राईम मुलीची गळफास लावून हत्या करत स्वतः आत्महत्या केली?

मुलीची गळफास लावून हत्या करत स्वतः आत्महत्या केली?

101

मुंबई: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होत असलेल्या वादातून ४३ वर्षीय स्टॉक ब्रोकरने ११ वर्षीय मुलीची गळफास लावून हत्या करत स्वतः आत्महत्या केल्याची घटना लालबाग परिसरात मंगळवारी घडली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. लालबाग येथील गणेश गल्लीतील विमावाला महाल येथील रुम क्रमांक १६ मध्ये पवार कुटुंबीय राहण्यास आहे. भूपेश पवार हे मुलगी आर्या आणि पत्नी भाग्यश्रीसोबत राहत होते. दोघांच्या लग्नाला बारा वर्षे झाली. घराजवळच असलेल्या एका खासगी फर्ममध्ये डीटीपी ऑपरेटर म्हणून नोकरी करत असलेल्या भाग्यश्री मंगळवारी सकाळी कामावर गेल्या. तासाभराने त्यांनी भूपेशला फोन केला. परंतु, त्याने उत्तर दिले नाही. संशय आल्याने त्या घरी आल्या तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दरवाजा तोडला असता, मुलगी आणि पती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने त्यांना धक्का बसला. पोलिसांना घटनास्थळावरून भूपेशने आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक सुसाइड नोट सापडली आहे. पत्नीच्या त्रासामुळे हे पाऊल उचलत असल्याचे त्यात नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.