माजी खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा दावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राहुल गांधींविरोधात आक्रमक झाले आहेत. दोन्ही पक्षांनी सावरकरांच्या सन्मानार्थ राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढली आहे. ठाण्यातही ही यात्रा काढण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. या यात्रेच्या समारोपावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली. काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?……स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या क्रांतीकारकांच्या बलिदानामुळे आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. सावरकर हे देशभक्त होते, राष्ट्रभक्त होते, प्रखर हिंदुत्ववादी होते. त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा काढली आहे. पूर्वी लोक हिंदुत्व हा शब्द उच्चारायला कचरत होते. परंतु २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हिंदुत्वाचा मान सन्मान जागा झाला. जाणीवपूर्वक हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम काही लोक करत आहेत. सावरकरांचे विचार रोखण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. देशातला हिंदू आता जागा झाला आहे, जागरुक झाला आहे आणि तो आता सक्रीय झाला आहे. पण काही लोक त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी, त्याना त्यांची जागा दाखवण्यासाठी ही सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे. सावरकरांचा अपमान केल्यामुळे मणिशंकर अय्यर यांना जोडे मारणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणारे लोक आता राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्या राहुल गांधींनी वारंवार सावरकरांचा अपमान केला त्यांच्यासोबत बसण्याचं पाप काही लोक करत आहेत, हे आपल्या राज्याचं दुर्दैव आहे. परंतु आम्ही मात्र सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही. या सरकारमधली कोणतीही व्यक्ती ते खपवून घेणार नाही. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.