Home क्राईम मुंबई येथे लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार!

मुंबई येथे लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार!

205

१५ जून वार्ता: मुंबई येथे लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना काल बुधवारी घडली. पीडित तरुणी परीक्षेला जात असताना तिच्यावर हा प्रसंग ओढावला. आरोपीला घटनेनंतर आठ तासात अटक करण्यात आल्याची माहिती जीआरपी अधिकाऱ्यांनी दिली आहे. नवाज करीम (वय 40 वर्षे) असं आरोपीचं नाव आहे. हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या स्थानकादरम्यान काल सकाळी ७:२८ वाजता हा भीषण प्रकार घडला.

पीडित तरुणी मुंबईतील गिरगाव इथली रहिवासी असून ती नवी मुंबईतील बेलापूर इथे एका परीक्षेला जात होती. पीडित तरुणी सीएसएमटी-पनवेल लोकल ट्रेनच्या सेकंड क्लास डब्यातून प्रवास करत होती. ट्रेन सुरु होताच आरोपी डब्ब्यात चढला. मुलगी एकटीच प्रवास करत होती. याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी तरुणीने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा सुरु केल्यानंतर आरोपीने मस्जिद बंदर स्थानकावर उतरुन पळ काढला. यानंतर तरुणीने रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरपीएफ, जीआरपी, क्राईम ब्रान्च आणि मुंबई पोलिसांनी पथके तयार करुन आरोपींचा शोध सुरु केला. पोलिसांनी मस्जिद बंदर स्थानकात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज तपासून त्या व्यक्तीची ओळख पटवली.