Home राजकारण मी काही अंडरवर्ल्ड डॉनसोबत तर फोटो काढलेला नाही ना? अजित पवार

मी काही अंडरवर्ल्ड डॉनसोबत तर फोटो काढलेला नाही ना? अजित पवार

91

एकीकडे काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी सातत्याने उद्योगपती गौतम अदाणींवर टीका करत आहेत. अदाणींवरून ते केंद्र सरकारला सवाल करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा यूपीएतला महत्त्वाचा साथीदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंडेनबर्ग अहवालानंतर उद्योगपती गौतम अदाणी यांच्या उद्योग समुहावर झालेल्या आरोपांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पवार म्हणाले की, आम्ही हिंडेनबर्ग कंपनीचं कधी नावही ऐकलं नव्हतं. त्या कंपनीच्या अहवालात अदाणींना लक्ष्य करण्यात आलं आहे असं दिसतं. दरम्यान शरद पवार जे बोलले तीच आमची आणि आमच्या पक्षाची भूमिका आहे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरीष्ठ नेते अजित पवार यांनी काल जाहीर केलं. अजित पवार म्हणाले की, शरद पवार हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी भूमिका मांडल्यानंतर आम्ही त्यावर बोलू शकत नाही. त्यांची भूमिका हीच आमच्या पक्षाची भूमिका आहे.

अजित पवारांकडून गौतम अदाणींची पाठराखण

अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा गौतम अदाणी यांची पाठराखण केली. अजित पवार आणि गौतम अदाणी एकत्र असलेला एक फोटो ट्विटरवर व्हायरल होत आहे. याबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना सवाल केला. त्यावर पवार म्हणाले की, माझा त्यांच्यासोबतचा फोटो कोणीतरी ट्विट केला. मी काही अंडरवर्ल्ड डॉनसोबत तर फोटो काढलेला नाही ना? लगेच अदाणींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही. विरोधी पक्षनेते म्हणाले की, कोणी ट्विटरवरुन आमच्यावर निशाणा साधला म्हणजे आमच्या अंगाला काही भोकं पडत नाहीत. प्रत्येकाच्या ट्विटला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही. असे तर रोज हौसे, नौसे, गौसे ट्विट करत राहणार त्यांना उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही.