Home क्राईम मातोंड शासकीय वनात भेरलेमाडाची पानं तोडणाऱ्या आरोपींना दोन दिवसांची वनकोठडी..!

मातोंड शासकीय वनात भेरलेमाडाची पानं तोडणाऱ्या आरोपींना दोन दिवसांची वनकोठडी..!

253

वेंगुर्ला येथील न्यायालयाने दिले आदेश.

 वेंगुर्ला प्रतिनिधी: मातोंड येथील शासकीय वनात भेरलेमाडाच्या पानांची तोड करून तस्करी केल्याप्रकरणी सावंतवाडी वनविभागाच्या फिरते पथकाने तळवडे येथील बाबल लाडू परब, वय-49 वर्षे व प्रकाश लाडू जाधव, वय-55 वर्षे, दोघेही राहणार मौजे-तळवडे यांना काल अटक केली होती. सदर आरोपींची चौकशी केली असता भेरलेमाडाच्या पानांची तोड ही मुंबई-पुणे येथे विक्रीच्या उद्देशाने पाठवण्यासाठी केली असल्याचे सदर आरोपींनी मान्य केले. आरोपींनी सोबत भेरलेमाड पानांच्या वाहतुकीसाठी आणलेली एक तीनचाकी रिक्षा (MH-07 C 5771), पाळ, कोयता देखील जप्त करण्यात आले होते. आज दोन्ही आरोपीना वेंगुर्ला येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची वन कोठडी सुनावली. या दरम्यान आरोपीच्या बाजूने ऍडव्होकेट सुनिल मालवणकर यांनी तर वनविभागाच्या बाजूने फिरते पथक वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी युक्तिवाद केला.

कोकणात आढळणारे भेरल्यामाड हे झाड जैविविधतेला पोषक असून महत्वाची खाद्याची भूमिका बजावते. आपल्या समृद्ध जंगलांमध्ये अधळणारे कित्येक प्राणी जसे की शेकरू, माकड, वानर, कटिंदर, वटवाघुळे यासोबतच पक्षी जसे की चार प्रकारचे धनेश (हॉर्नबील), सुतारपक्षी तसेच कित्येक प्रकारचे कीटक, सरपटणारे प्राणी अन्न व निवाऱ्यासाठी या झाडावर अवलंबून असतात. यासोबतच दोडामार्ग मध्ये आढणाऱ्या वन्यहत्तीचे देखील हे आवडते खाद्य आहे. याप्रकारे बेसुमार भेरलेमाड झाडांची तोड व नुकसानी केल्यामुळे सदरचे वन्यजीव जंगलामध्ये न थांबता खाद्यासाठी मालकी मधील शेत बागायतींचे नुकसान करतात व मानव वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. यासोबतच भेरलेमाडावर अवलंबून असणारी रेड पाम विवील ही जी कीड आहे ती देखील आपल्या नारळ झाडांवर मोठया प्रमाणावर स्थलांतरीत होत आहे. ज्यामुळे माडांच्या उत्पादनात मोठी घट दिसून येत आहे. सदर झाडाच्या पानांचा वापर पुष्पगुच्छ तसेच मोठमोठया समारंभामध्ये शोभेसाठी या पानांना पुणे-मुंबई येथे मोठी मागणी असल्याने काही स्थानिक नागरिक पैशांच्या अमिषाला बळी पडून भेरलेमाड तोड करून किंवा त्याची पाने काढून विक्री करताना दिसून येत आहेत. तरी सावंतवाडी वन विभागाकडून सर्व सुजाण नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या मालकी क्षेत्रामध्ये सुरु असलेली भेरलेमाड झाडांची व पानांची तोड रोखावी व शासकीय जंगल हद्दीमध्ये असे कुणी तोड करत असेल तर तात्काळ जवळच्या वन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा 1926 या टोल फ्री क्रमांकावर कळवावे.