राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘सकाळ’ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना विचारले असता त्यांनी दिलखुलास उत्तर दिलं आहे.
काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
मला कोणीही मुख्यमंत्री झाले तर आवडेल. महाराष्ट्रासाठी २४ तास झोकून देऊन काम करणारा कोणताही माणूस मला मुख्यमंत्री झालेला आवडेल, असं उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं आहे. अजित पवार जर भाजपमध्ये आले आणि त्यांनी भाजपमध्ये येऊन मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली तर या प्रश्नावर अमृता फडणवीस म्हणाल्या, मला वाटतं महाराष्ट्र असं राज्य आहे जे खूप काही करू शकतं. खूप काही करत आहे. यासाठी जो माणूस आपल्या जनतेला पुढे नेतो तो व्यक्ती किंवा पक्ष चांगला आहे. मग तो कोणीही असला तरी चालेल. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्यांच्यात मैत्री कशी आहे, यावर अमृता फडणवीस म्हणाल्या की, हे माझ्यापेक्षा त्या दोघांना जास्त माहीत आहे. राजकारणी लोक त्यांच्या मैत्रीत अनेकदा डोळे मारतात, असा खोचक टोलाही अमृता फडणवीस यांनी अजित पवार यांना लगावला आहे.