प्रभाग ड कार्यालयासमोरील शिल्प दयनिय स्थितीत….
कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – स्मार्ट सिटीच्या दिशेने धाव घेणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शहर सौंदर्यीकरणाच्या नावाने लाखो रुपयांची उधळण होतांना दिसत आहे. परंतु होत असलेल्या सैंदर्यीकरणाची निगा आणि दोष दुरुस्तीची जबाबदारी कोणाची ही बाब स्पष्ट होत नसल्याने काही महिन्यातच अनेक शिल्पांची दुरावस्ता झाल्याचे दिसून येत असतांनाच प्रभाग ५ ड कार्यालयासमोर १५ लाखांच्या निधीतून सौंदर्यीकरण झालेल्या शिल्पांची अवस्था दैयनिय झाली आहे. या निमित्ताने अशा प्रकारच्या शिल्पांवर महापालिका लाखो रुपये खर्च करीत असेल तर निर्मिती होत असलेल्या शिल्पांची निगा राखण्याची जबाबदारीही महापालिकेने निश्चित करावी अशी सुज्ञ नागरीकां कडून मागणी पुढे येऊ लागली आहे. महापालिका क्षेत्रातील स्मार्ट सिटी अंतर्गत प्रभाग ड कार्यालयासमोरील पुणे लिंक रोड च्या कडेला तद्कालीन महापौर स्व. राजेंद्र देवळेकर यांच्या १५ लाखांच्या महापौर निधीतून सुंदरसे शिल्प साकारण्यात येवून हा परिसर सुशोभित करण्यात आला होता. परंतु या शिल्पांची निगा आणि दोष दुरुस्तीची जबाबदारी ना महापालिकेने घेतली ना ती जबाबदारी संबंधीत ठेकेदाराकडे सोपवली. यामुळे काही महिन्यातच या शिल्पाची दुरावस्था झाली आहे. आता तर या शिल्पाची अत्यंत दुरावस्था झाल्याने या संपूर्ण परिसराला अवकळा आली आहे.
या ठिकाणच्या पथपथावर बाजुलाच असलेल्या पाणी पुरवठा विभाग कार्यालयाने मोठ मोठ्या निकामी जलवाहिन्या रचून ठेवल्या आहेत त्या मुळे नागरीकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. या समस्येकडे कोणत्याही लोकप्रतिनीधीचे अथवा पालिका अधिकाऱ्याचेही लक्ष जात नसल्याने नागरीकांत आश्चर्य युक्त संताप व्यक्त केला जात असून नवीन शिल्पांची निर्मिती करतांना तरी कीमान पुढील ५ वर्षे त्या शिल्पांची निगा आणि दोष दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधीत पालिकेच्या विभागाकडे कींवा त्या ठेकेदाराकडे द्यावी अशी मागणी सुज्ञ नागरीकांकडून पुढे येऊ लागली आहे.