मसूरे प्रतिनिधी: विद्यार्थी जीवनापासूनच शेतीविषयक आवड निर्माण व्हावी, शेतीतील विविध टप्प्यांची माहिती व्हावी यासाठी दरवर्षी ‘एक दिवस बळीराजासाठी’ हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत घेण्यात येतो. शेतात मिळणारा हा आनंद फक्त आणि फक्त गाव खेड्यातील मुलंच अनुभवू शकतात आणि म्हणूनच ती जन्मभूमीच्या मातीशी आयुष्यभर एकरूप होऊन जातात. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा या शाळेतील विद्यार्थ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नांगरणी, तरवा काढणे, तरवा लावणे, शेतकऱ्यांची मुलाखत इत्यादी उपक्रमातून शेती विषयक माहिती जाणून घेतली. याचवेळी विरंगुळा म्हणून शेतीमधील गीतांचे गायन करत शेतातच ताल धरला.
या उपक्रमासाठी शेतकरी श्री. समीर बागवे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदानंद कबरे, मुख्याध्यापक प्रशांत पारकर, शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर, तेजल ताम्हणकर, कविता सापळे यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले.