सिंधुदुर्ग प्रतिनिधी: प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार, मराठवाड्यात पुढील चार दिवसांत वादळी वाऱ्यासहपाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज ‘वनामकृ‘ विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे. गेल्या दोन दिवसात मराठवाड्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे. तर काही लोक जखमी देखील झाले आहेत. त्यातच आता पुन्हा चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान २७ एप्रिल रोजी परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत, तर २८ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे, असा अंदाज परभणीच्या ‘वनामकृ‘ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर अवकाळी पावसाचा बागांना मोठा फटका बसत आहे. तर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत करण्याची मागणी देखील केली जात आहे.