महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. स्टम्पच्या साहाय्याने मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात संदीप देशपांडेंना किरकोळ दुखापत झाली आहे. हल्ल्यानंतर संदीप देशपांडेंना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्कमध्ये गेले होते. तेव्हा शिवाजी पार्कमध्ये असलेल्या एका टोळक्याने संदीप देशपांडे यांच्यावर स्टम्पच्या साहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे.टोळक्याने केलेल्या हल्ल्यानंतर संदीप देशपांडेंना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. हल्लेखोरांबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.