Home स्टोरी मंत्रालयातील ३८ विभागांच्या फेर्‍या वाचणार, टपाल एकाच ठिकाणी देता येणार !

मंत्रालयातील ३८ विभागांच्या फेर्‍या वाचणार, टपाल एकाच ठिकाणी देता येणार !

102

मुंबई :– मंत्रालयात येणार्‍या सामान्य नागरिकांच्या टपालावर जलद गतीने कार्यवाही व्हावी, यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र चालू करण्यात येणार आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी १० एप्रिल या दिवशी पत्रकार परिषद घेऊन दिली. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हे टपाल केंद्र चालू करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना अर्ज देण्यासाठीच्या मंत्रालयातील ३८ विभागांच्या फेर्‍या वाचणार आहेत.
याविषयी अधिक माहिती देतांना सुजाता सौनिक म्हणाल्या, टपालांवर तात्काळ कार्यवाही व्हावी आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी लवकरच हे टपाल केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये संबंधित विभागाने स्वीकारलेले टपाल ‘स्कॅन’ करून संबंधित प्रशासकीय विभागाच्या नोंदणी शाखेस ‘ई-ऑफिस’द्वारे ‘ऑनलाईन’ पाठवण्यात येईल. यासाठी मध्यवर्ती टपाल केंद्रातील विभागांसाठी स्वतंत्र ‘ई-खाते’ सिद्ध करण्यात येणार आहे. नोंदणी शाखेस ‘ई-ऑफिस प्रणाली’द्वारे ऑनलाईन पाठवण्यात आलेल्या टपालावर संबंधित विभागाने ‘ई-ऑफिस प्रणाली’च्या माध्यमातून कामकाज करणे अपरिहार्य आहे.’’ नागरिकांच्या सोयीसाठी ‘मोबाईल ॲप’ चालू करण्याचा मानस !
‘आपले सरकार’ वेब पोर्टलच्या माध्यमातून ५११ पैकी ३८७ सेवा नागरिकांना दिल्या जातात. शासनाचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी यामध्ये आणखी १२४ सेवांचा समावेश करण्यात येणार आहे. नागरिकांना सेवा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी ‘मोबाईल ॲप’ही चालू करण्याचा शासनाचा मानस आहे, अशी माहिती या वेळी सुजाता सौनिक यांनी दिली.