Home स्टोरी भावी पिढीने महामानवांचे विचार जोपासण्याची गरज..!अर्जुन रावराणे

भावी पिढीने महामानवांचे विचार जोपासण्याची गरज..!अर्जुन रावराणे

88

वैभववाडी: आपल्या देशातील महामानवांनी आपल्या देशाच्या व संपूर्ण समाजाच्या विकासासाठी निस्वार्थी वृत्तीने जे कार्य केले त्यांच्या कार्यापासून आपण सर्वांनी प्रेरणा घेऊन त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. आजच्या भावी पिढीने आपल्या सर्व महामानवांचे विचार जोपासण्याची नितांत गरज आहे, असे आवाहन महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे खजिनदार मा. श्री.अर्जुन रावराणे यांनी महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शाहू महाराज यांच्या संयुक्त जयंती प्रसंगी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना केले. आनंदीबाई रावराणे महाविद्यालयामध्ये दिनांक २९ जून २०२४ रोजी महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शाहू महाराज यांचा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संख्याशास्त्रज्ञ डॉ. महानलोबीस यांचीही जयंती साजरी करण्यात आली व त्यानिमित्त भित्तीपत्रकाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना अर्जुन रावराणे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सर्व राष्ट्रपुरुषांच्या महान कार्याची आठवण करून दिली. या कार्यक्रमाप्रसंगी स्थानिक कमिटीचे अध्यक्ष मा. सज्जनकाका रावराणे यांनी या दोन्ही राष्ट्रपुरुषांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करताना उपस्थितांना सांगितले की आपण आपल्या महापुरुषांच्या जयंत्या साजरा करत असताना त्यांचे कार्यही आपण समजून घेतले पाहिजे व त्यांच्या विचारांप्रमाणे आपण आचरण केले पाहिजे. स्थानिक कमिटी सचिव मा. प्रमोद रावराणे यांनीही या कार्यक्रमानिमित्त आपण आपल्या राष्ट्रपुरुषांना धर्मामध्ये व जातीमध्ये अडकवून न ठेवता त्यांच्या विचारांची व कार्याची आपण सर्वांनी जोपासना करावी असे आवाहन केले.

या जयंतीनिमित्त महाविद्यालयातील तुषार पार्टे, श्रुती खाडे, प्रणिता फोंडके व अपर्णा कोलते या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. हा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. यामध्ये महाविद्यालयाच्या वैभवराणा या वार्षिक अंकाचे प्रकाशन, महाविद्यालयाच्या नूतन वेबसाईटचे उद्घाटन, विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप, CPBFI कोर्सेचे प्रमाणपत्रे वाटप, उमेद फाउंडेशन तर्फे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व महाविद्यालयातील कर्मचारी श्री. बी. एल. बावदाने यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाप्रसंगी त्यांचा सत्कार समारंभ अशा विविध कार्यक्रमांनी आजची ही संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयीन कर्मचारी श्री. बावदाने यांच्या सेवानिवृत्ती व सत्कार समारंभाप्रसंगी त्यांचे सहकारी श्री. संजय रावराणे, श्री. सुधीर जाधव प्रा. डॉ. एन. व्ही. गवळी यांनी श्री. बावदाने यांच्या नियुक्तीपासून त्यांच्या सोबतचा आजपर्यंतचा प्रवास सर्वांसमोर आपल्या शब्दांमध्ये मांडला. श्री. बावदाने यांनीही आपल्या नोकरीचा अनुभव उपस्थितांसमोर आपल्या शब्दांमध्ये सादर केला. या जयंतीप्रसंगी विचार मंचावर शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. गणपत दाजी रावराणे,श्री. शरदचंद्र रावराणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, उपप्राचार्य डॉ. एम. आय. कुंभार उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून चांगले सहकार्य केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, सूत्रसंचालन प्रा. निलेश कारेकर व उपस्थितांचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डी. एस. बेटकर यांनी मानले.