चार महिने कन्याकुमारी ते श्रीनगर अशी भारत जोडो यात्रा आम्ही काढली. व्हिडिओत तुम्ही माझा चेहरा पाहिला. मात्र आमच्यासोबत लाखो लोकं चालत होते. प्रत्येक राज्यात लोक आमच्यासोबत चालले. उन, वारा, पाऊस, थंडी यांची पर्वा न करता लोक भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. भारत जोडो यात्रा मला खूप काही शिकवून गेली. भारत जोडो यात्रेमुळे माझा अहंकार नष्ट झाला असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे. काय म्हणाले राहुल गांधी?…मी व्हिडिओ पाहात होतो तेव्हा मला अनेक आठवणी आल्या. तुम्ही सगळ्यांनीही पाहिलं असेल पंजाबमध्ये एक मॅकेनिक येऊन मला भेटला. मी त्याचे हात हातात घेतले त्यानंतर अनेक वर्षांचे त्याचे प्रयत्न, त्याच्या वेदना या मी ओळखल्या. अशाच प्रकारे लाखो शेतकऱ्यांना मी भेटलो. त्यांच्याशी हात मिळवलं, त्यांना भेटलो की मला त्यांच्या व्यथा कळत असत असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यावेळी राहुल गांधी यांनी हे भाषण केलं आहे.केरळच्या बोट रेसमध्ये मी बोटीत बसलो होतो. तेव्हा पूर्ण टीमसह मी पुढे चाललो होतो. माझ्या पायात खूप वेदना होत होत्या. मी फोटो काढले जात होते, पण मी हसत होतो, पण रडावंसं वाटत होतं इतक्या वेदना होत्या. मी यात्रा सुरू केली तेव्हा मला एक अहंकार होता की मी तर आरामत ही यात्रा पूर्ण करेन. माझ्या मनात ही बाब तेव्हा होती. मात्र त्याचवेळी जुन्या एका जखमेने डोकं वर काढलं. मी महाविद्यालयात असताना फुटबॉल खेळत असाताना माझ्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर ही दुखापत बरी झाली. मात्र मी जेव्हा भारत जोडो यात्रा सुरू केली तेव्हा या वेदना परत होऊ लागल्या.तुम्ही सगळे माझं कुटुंब आहात तुम्हाला मोकळेपणाने सांगतोय. मी रोज सकाळी हाच विचार करायचो रोज कसं चालू? मला रोज प्रश्न पडायचा. मी कंटेनरमधून उतरायचो आणि चालायला सुरूवात करायचो. लोकांना भेटायचो, पहिल्या दहा पंधरा दिवसात माझा अहंकार संपला असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. माझा अहंकार का संपला कारण, भारतमातेने मला हा संदेश दिला की तू निघाला आहेस, तुला कन्याकुमारी ते काश्मीर चालायचं आहे तर आधी अहंकार संपव. मला ही भारतमातेनेच दिलेली साद होती. मी ते ऐकलं, त्यामुळेच माझी भारत जोडो यात्रा यशस्वी झाली असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.आधी मी शेतकऱ्यांना भेटायचो तेव्हा मी त्याला काही उपदेश करण्याचा प्रयत्न करायचो. माझ्या परिने त्याला सांगू लागायचो. मात्र हळूहळू हे सगळं बंद झालं. एक शांतता मला लाभली. त्या शांततेत मी लोकांचं म्हणणं गांभीर्याने ऐकू लागलो. हे सगळे बदल हळूहळू झाले. त्यानंतर जेव्हा मी काश्मीरला पोहचलो तेव्हा मी खूपच शांत झालो होतो असंही राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे.
Home Uncategorized “भारत जोडो यात्रेमुळे माझा अहंकार….”, राहुल गांधी यांचं CWC च्या बैठकीत वक्तव्य..