Home स्टोरी भारत अमेरिकेकडून तब्बल ३० ‘MQ-9B रीपर’ ड्रोन खरेदी करणार

भारत अमेरिकेकडून तब्बल ३० ‘MQ-9B रीपर’ ड्रोन खरेदी करणार

162

१६ जून वार्ता: संरक्षण अधिग्रहण परिषदेनं (DAC) गुरुवार दि.१५ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या अमेरिका दौऱ्यापूर्वी अमेरिकन कंपनी जनरल अॅटोमिक्सकडून प्रीडेटर MQ-9B रीपर (MQ-9B Reaper) ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. भारत अमेरिकेकडून तब्बल ३० ड्रोन खरेदी करणार आहे. भारतीय नौदलाने हे दोन ड्रोन आधीच भाड्याने घेतले आहेत. MQ-9B रीपर हे जगातील सर्वात घातक ड्रोन मानलं जातं.

MQ-9B Reaper (संग्रहित फोटो)

वृत्तसंस्था पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं माहिती दिली की, चीनच्या सीमेवर सशस्त्र दलांची देखरेख करण्यासाठी तेवढ्या सक्षम उपकरणांची गरज आहे. त्यासाठी अमेरिकेकडून MQ-9B प्रीडेटर ड्रोन खरेदी केले जाणार आहेत. सुमारे तीन अब्ज डॉलर्सचा हा खरेदी करार असून, त्यासाठी संरक्षण मंत्रालयानं हिरवा कंदील दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन पुढील आठवड्यात व्हाईट हाऊसमध्ये भेटणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर ड्रोन खरेदी करण्यासंदर्भातील कराराची घोषणा होण्याची शक्यता आहे. डीएसीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत ड्रोन खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आहे.

MQ-9B रीपर्स ड्रोन(संग्रहित फोटो )

MQ-9B रीपर्स ड्रोनचे दोन प्रकार आहेत, जे स्काय गार्डियन आणि सी गार्डियन म्हणून ओळखले जातात. भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांसाठी ‘सी गार्डियन’ प्रकार खरेदी करण्यात आला आहे. हे ड्रोन सागरी देखरेखीसाठी वापरले जाऊ शकतात, तसेच पाणबुडीविरोधी युद्धासह विविध भूमिका बजावू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेकडून खरेदी करण्यात येणार्या ३० ड्रोनपैकी १४ नौदलाला, तर हवाई दल आणि लष्कराला प्रत्येकी आठ ड्रोन मिळू शकतात.