Home राजकारण भाजपा हा पराभव सहन करणार नाही!पृथ्वीराज चव्हाण….

भाजपा हा पराभव सहन करणार नाही!पृथ्वीराज चव्हाण….

121

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले त्याचप्रमाणे कर्नाटकतही भाजपाने सत्ता स्थापन केली होती. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर टीका केली आहे. “ज्या पापातून कर्नाटक सरकारची निर्मिती झाली, तीच गोष्ट महाराष्ट्राला लागू होते”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. ते टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते.

“भाजपा हा पराभव सहन करणार नाही. काहीतरी क्लृप्त्या सुरूच ठेवील. यातून काही निष्कर्ष काढायचे झाले तर दोन्ही ठिकाणी कर्नाटक आणि महाराष्ट्रात घोडाबाजार करून सरकार खाली खेचलं. तेव्हा प्रचंड मोठा पैशांचा गैरवापर झाला, चौकशी संस्थांचा गैरवापर झाला, पैशांचं आमिष दाखवलं गेलं. ज्या पापातून कर्नाटक सरकारची निर्मिती झाली तीच महाराष्ट्राला गोष्ट लागू होते. सरकार स्थापन करण्याकरता जे व्यवहार करावे लागले, तो खर्च केला गेला, आर्थिक व्यवहार केले, याबाबत आमच्या पक्षाने रेटलिस्ट जाहीर केली होती. याला पुरावा नसतो, पण चर्चा आहे. सत्तास्थापनेसाठी खर्च झालेला पैसा वसूल करण्याकरता वसुली सरकार सुरू झालं. कोणतंही कामं करताना सरकार ४० टक्के कमिशनने काम करतंय, ही ऐकिव माहिती नाही. याविषयी एका कंत्राटदाराने पंतप्रधानांना पत्रेही लिहिले. या पत्रात सरकारचं आणि संबंधित मंत्र्याचंही नाव लिहिलं होतं. मात्र दुर्दैवाने त्या कंत्राटदाराने नंतर आत्महत्या केली”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.